कोकण रेल्वेचा स्वच्छता दूत ! कुमठा स्थानक ठरतेय कोकण रेल्वेचे आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 01:16 PM2018-01-18T13:16:53+5:302018-01-18T13:18:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनपासून प्रेरणा घेऊन राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एक व्यावसायिक स्वयंप्रेरणेने कोकण रेल्वे मार्गावरील कुमठा रेल्वे स्थानकात स्वच्छता दूताची भूमिका इमानेइतबारे निभावित आहे.
नारायण जाधव / कुमठा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनपासून प्रेरणा घेऊन राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एक व्यावसायिक स्वयंप्रेरणेने कोकण रेल्वे मार्गावरील कुमठा रेल्वे स्थानकात स्वच्छता दूताची भूमिका इमानेइतबारे निभावित आहे. श्रावणलाल अगरवाल असे या अवलियाचे नाव असून त्याच्या या मिशनचा कोकण रेल्वेस सार्थ अभिमान असल्याचा विश्वास कोकण रेल्वेचे कारवार विभागीय सहाय्यक महाव्यवस्थापक मोहम्मद असीफ सुलेमान व्यक्त केला.
कोकण रेल्वे मार्गावरील कुमटा हे एक छोटे स्टेशन. दिवसभरात येजा करणाऱ्या 26 गाड्या या ठिकाणी थांबतात. यामुळे तीन तालुक्यांच्या दृष्टीने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सुरुवातीला हे स्थानक इतर स्थानकांसारखे गलिच्छ होते. एक दिवस कापड व्यावसायिक अगरवाल यांना हा गलिच्छपणा पाहवला नाही. त्यांनी स्वत:च हाती झाडू घेऊन स्वच्छतेस सुरुवात केली. नंतर हे स्थानकच दत्तक घेतले. आता आठवड्यातून दोनदा 20 कामगारांना घेऊन स्थानक स्वच्छ करतात.
या कामगारांना जेवण आणि दिवसभरासाठी हजार रुपये मजुरी स्वताच्या खिशातून देतात. गेली तीन वर्षे त्यांची ही स्वच्छता अविरत सुरू आहे. यामुंळे ते खऱ्या अर्थाने स्वच्छता दूत ठरले आहेत. अगरवाल एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कुमठा स्थानकात स्वखर्चाने सीसीटीव्ही बसवून सुरक्षिततेचा वसा ही जपला आहे. त्यांचे हे दातृत्व नक्कीच गौरवास्पद असल्याचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर म्हणाले.
देशातील धनिक नागरिकांनी स्वंयप्रेरणेने पुढे येऊन एकेक करून सर्व रेल्वे स्थानक दत्तक घेतले तर भारतीय रेल्वे जगात सर्वोत्तम होईल, असे अगरवाल सांगतात. तर अगरवाल याची स्वच्छतेप्रती असलेली निष्ठा आम्हालाही खूप काही करून शिकवून जाते असे मत कोकण रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक सुनील नारकर यांनी व्यक्त केले.