गणेश चतुर्थी पूर्वी खुला होणार कोपर पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:42 AM2021-07-28T04:42:22+5:302021-07-28T04:42:22+5:30
कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल गणेश चतुर्थी पूर्वी खुला होणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश ...
कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल गणेश चतुर्थी पूर्वी खुला होणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मंगळवारी दिली.
पुलाचा स्लॅब काँक्रिटने भरण्याच्या कामाचा प्रारंभ म्हात्रे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे, शिवसेनेचे पदाधिकारी आशुतोष येवले आदी उपस्थित होते.
कोपर पूल धोकादायक झाल्याने रेल्वे आणि केडीएमसीने एकत्रित निर्णय घेऊन पूल वाहतुकीसाठी बंद केला. जवळपास १० कोटी रुपये खर्चून हा पूल उभारला जात असून, केडीएमसी व रेल्वेने निम्मा खर्च उचलला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला असताना, हा पूल पाडून नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. हा पूल वाहतुकीसाठी १५ जुलैला खुला केला जाईल, अशी डेडलाइन प्रशासनाने दिली होती, परंतु पुलाच्या कामासाठी ऑक्सिजनची कमतरता भासल्याने कामाचा वेग मंदावला होता. आता या पुलाच्या कामाला गती दिली असून, काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाचा स्लॅब काँक्रिटीने भरल्यावर पुलाचे काम पूर्णत्वास येईल. त्यानंतर, तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
या पुलाच्या कामावर देखरेख ठेवून असलेले प्रकल्प अभियंते तरुण जुनेजा यांनी सांगितले की, ऑगस्ट अखेरपर्यंत पुलाची सर्व कामे मार्गी लावली जातील. दरम्यान, हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
-------------