कोपर उड्डाणपुलाला आता जुलैचा मुहूर्त?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:30+5:302021-05-29T04:29:30+5:30
डोंबिवली : येथील महत्त्वपूर्ण असलेल्या कोपर उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने मे महिन्याची डेडलाइन पुन्हा तांत्रिक ...
डोंबिवली : येथील महत्त्वपूर्ण असलेल्या कोपर उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने मे महिन्याची डेडलाइन पुन्हा तांत्रिक कारण देऊन पुढे नेली असून, जूनअखेरीस ते पूर्ण होईल, असा दावा आता महापालिका प्रशासन करत आहे. त्यामुळे जुलै महिन्यातच त्याचा शुभारंभ होण्याची शक्यता असून, पावसाळा सुरू झाल्यास डोंबिवलीकरांचे हाल सुरूच राहणार आहेत.
आधी कोरोनामुळे कामगार संख्या रोडावली होती, त्यानंतर राज्यात ऑक्सिजन तुटवडा झाल्याने इंडस्ट्रीयल ऑक्सिजनवर देखील बंदी आणली होती. त्याचा थेट पुलाच्या कामावर परिणाम झाला होता. त्यात आता तौक्ते वादळाची भर पडली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हा पूल बांधून होत नसल्याचा फटका शहरातील दुचाकी, चारचाकी, तसेच अन्य अवजड वाहने चालवणाऱ्या चालकांना बसत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दीड वर्षापूर्वी तो पूल तोडण्यात आला होता. तेव्हापासून त्याच्या शुभारंभाला विलंब झाला. सुरुवातीलाच नकारघंटा लागल्याने या पुलाच्या कामात अनेक अडथळे सातत्याने येतच आहेत. त्यामुळे तो वाहनांसाठी खुला करण्यात तारीख पे तारीख मिळत आहे. या पुलाचे एकूण २१ गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. पण अजूनही त्यावर रस्ता तयार करणे, जोड रस्ते बनवणे आदी कामे बाकी आहेत. ती करण्यासाठी नियोजन केले असतानाच तौक्ते वादळामुळे पडलेला पाऊस आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे गेल्या आठवड्यात कामाची गती मंदावली होती. आता पुन्हा काम सुरू करण्यात आले असले तरीही जून महिनाअखेरीपर्यंत वेळ लागणार असल्याची माहिती शहर अभियंत्या सपना कोळी यांनी दिली.
-------------
शहरात दुतर्फा जाताना ठाकुर्लीच्या अरुंद उड्डाणपुलावरून वळसा घालून ये-जा करावी लागते, त्यात कोरोनाकाळात तेथे पोलीस तपासणी सुरू असल्याने वाहतूक कोंडी होते. या सगळ्याचा त्रास वर्षभर सुरू असून, जुलै महिन्यात तरी पूल नागरिकांना खुला होणार आहे का, की केवळ तोंडाला पानं पुसायची म्हणून तारीख पे तारीख मिळत आहे. प्रशासनाने नेमके काय ते खरं स्पष्ट करावे.
- मनोहर गचके, त्रस्त दुचाकीचालक
--–-----------