कोपरी पोलिसांकडून ४४ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:45+5:302021-03-06T04:38:45+5:30
ठाणे : कोपरी भागातून सहा बॅगांमधून गांजाची तस्करी करणाऱ्या संशयितांना कोपरी पोलिसांनी हटकल्यानंतर नऊ लाख ५७ हजार २८० रुपयांचा ...
ठाणे : कोपरी भागातून सहा बॅगांमधून गांजाची तस्करी करणाऱ्या संशयितांना कोपरी पोलिसांनी हटकल्यानंतर नऊ लाख ५७ हजार २८० रुपयांचा ४४ किलो ३६४ ग्रॅम गांजा बुधवारी जप्त केला. या धुमश्चक्रीत अंधाराचा फायदा घेऊन या दोघांनी मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तिथून पलायन केले. या दोघांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोपरीतील शास्त्रीनगर टीएमटी बस थांब्यासमोरील रस्त्यावर बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास दोघे जण सहा बॅगा संशयास्पदरीत्या घेऊन जात असल्याचे गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद साळवी, पोलीस व्हॅनचे चालक शेडगे आणि अंमलदार लोंढे यांना आढळले. हे दोघेही एका रिक्षामध्ये या बॅगा ठेवण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी साळवी यांच्या पथकाने त्यांना हटकले. या बॅगांमध्ये तांदूळ आणि कपडे असल्याची बतावणी त्यांनी केली. याची पडताळणी करण्यासाठी साळवी यांच्या पथकाने त्यांना बॅगा उघडण्यास सांगितले. त्याचवेळी या दोघांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत ते तिथून पसार झाले.
या बॅगांपैकी एका बॅगेत दोन किलो ७४ हजार ४८० रुपयांचा १३ किलो ७२४ ग्रॅम, तर दुसऱ्या बॅगेत आठ किलो ६०८ ग्रॅम इतका गांजा चार गठ्ठ्यांमध्ये आढळला. अन्य एका बॅगेतून एक लाख ७० हजार १२० रुपयांचा गांजा मिळाला. अशा सहा बॅगांमधून एकूण नऊ लाख ५७ हजार २८० रुपयांचा ४४ किलो ३६४ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला.
एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा
या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपींविरुद्ध एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांनी दिली. पसार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
--------------