कोपरीतील वाहने जळीतकांडामागे अल्पवयीन सूत्रधार?, तक्रारदाराने व्यक्त केला संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 02:57 PM2017-09-18T14:57:52+5:302017-09-18T14:58:09+5:30
कोपरीतील ठाणेकर वाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार १४ सप्टेंबर रोजी घडला होता. या घटनेमागे त्याच सोसायटीमधील काही अल्पवयीन मुलांवर तक्रारदारांनी संशय व्यक्त केला आहे. मात्र, अद्यापही नेमका आरोपी कोण? याचा शोध सुरुच असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.
ठाणे,दि. 18 - कोपरीतील ठाणेकर वाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार १४ सप्टेंबर रोजी घडला होता. या घटनेमागे त्याच सोसायटीमधील काही अल्पवयीन मुलांवर तक्रारदारांनी संशय व्यक्त केला आहे. मात्र, अद्यापही नेमका आरोपी कोण? याचा शोध सुरुच असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.
ठाणेकर वाडीतील शांतीनगरमधील गोमती बंगल्यासमोरील ‘दत्तविजय सोसायटी’ या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या तीन दुचाकींना गुरुवारी पहाटे २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास आगी लावण्याचा प्रकार घडला होता. वेळीच अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणल्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीमध्ये सोसायटीच्या ए विंगमधील सुब्रमण्यम मुदलीयार यांच्या दोन तर योगेश कार्ले यांची एक दुचाकीं जळाली होती. सुरुवातीला आपली या आगीबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगणा-या मुदलीयार यांनी नंतर मात्र रितसर तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या सोसायटीतील एक जण आणि शांतीनगर येथील एक अल्पवयीन मुलगा अशा दोघांनी कॅरम खेळण्यासाठी सोसायटीच्या व्यायाम शाळेची चावी मागितली होती. मात्र, व्यायाम शाळेचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्यांनी चावी देण्यास नकार दिला. यातूनच संशयित आरोपींनी रहिवाशांना जमा करुन काही काळ गोंधळही घातला होता. त्यांनीच आग लावून गाडया जाळल्याचा संशय मुदलीयार यांनी या तक्रारीमध्ये व्यक्त केला आहे. अर्थात, याच संशयितांकडे आता चौकशी केली जात असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक एस. डी. कोर्डे यांनी सांगितले.