कोपरीतील मैदान खेळासाठीच राहणार
By admin | Published: June 10, 2017 01:06 AM2017-06-10T01:06:35+5:302017-06-10T01:06:35+5:30
कोपरी परिसरात एकमेव असलेल्या मोकळ्या मैदानावर पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचा घाट जिल्हाधिकारी कार्यालयाकडून
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोपरी परिसरात एकमेव असलेल्या मोकळ्या मैदानावर पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचा घाट जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घातल जात आहे. त्याला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पोलीस ठाण्याला पर्यायी जागा देण्यात येणार असून हे आरक्षित मैदान खेळासाठीच राहणार असल्याची माहिती ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी दिली.
कोपरीतील या मैदानावर होणाऱ्या पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामाला नागरिकांनी विरोध दर्शवल्यानंतर स्थानिक नगरसेवक मालती पाटील, नम्रता पमनानी, भरत चव्हाण, माजी नगरसेवक गिरीश राजे, शिवसेनेच्या महिला संघटक नीलम भोईर, शाखाप्रमुख वसंत हिंगे, प्रशांत पाटील आदींनी खासदार विचारे आणि आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे याबाबत कैफियत मांडली होती.
या १६०० चौरस मीटरमध्ये असलेल्या शासनाच्या मोकळ्या मैदानात येथील रहिवासी दरवर्षी अनेक सांस्कृतिक उपक्रम तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करतात. त्यामुळे या जागेवर पोलीस ठाण्याचे बांधकाम झाल्यास कोपरीतील नागरिकांना मैदानापासून वंचित राहावे लागेल. याच कारणासाठी स्थानिक रहिवाशांचा पोलीस ठाण्याच्या इमारतीला विरोध आहे. पोलीस ठाण्याला आम्ही पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ, पण मोकळे मैदान हे खेळासाठीच राहील, अशी भूमिका विचारे यांनी घेऊन रहिवाशांना विश्वासात घेतले. यासंदर्भात ठाण्याचे पालकमंत्री तथा स्थानिक आमदार एकनाथ शिंदे हे लोकप्रतिनिधींसह पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तत्कालीन नगरसेवक पांडुरंग पाटील यांनी या मैदानासाठी ही जागा शासनाकडून विनामूल्य महापालिकेस हस्तांतरित करावी, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यासाठी महापालिकेने २००५ मध्ये तसा ठरावही केला आहे. त्यानुसार, खेळाचे मैदान म्हणून ही जागा महापालिकेने आरक्षित केल्याचा ठराव एकमताने मंजूरही झालेला असल्याचे विचारे यांनी सांगितले. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही खेळाच्या या मैदानाला ना-हरकत देऊन मान्यता दिली. फक्त महापालिकेस ही जागा हस्तांतरित होणे बाकी आहे. ती लवकरच होईल. यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार या नव्याने होणाऱ्या पोलीस ठाण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही विचारे यांनी दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.