कोपरी पुलावरून शिवसेना-भाजपात कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:48 AM2018-05-22T06:48:05+5:302018-05-22T06:48:05+5:30

श्रेयवादाची लढाई : भूमिपूजनाच्या जाहिरातीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळले, खर्चवाढीच्या मुद्द्यावर मात्र नेत्यांची मिठाची गुळणी

From Kopri bridge to Shivsena-BJP, Kalgitura | कोपरी पुलावरून शिवसेना-भाजपात कलगीतुरा

कोपरी पुलावरून शिवसेना-भाजपात कलगीतुरा

Next

ठाणे : ठाणेकरांना दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या कोपरी रेल्वेपुलाच्या रूंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. परंतु, हे भूमिपूजन आणि एकूणच या पुलाच्या कामावरून आता शिवसेना आणि भाजपात श्रेयाचे राजकारण तापले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर या दोघांनी याचे श्रेय घेतले आहे.
कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम १७ वर्षे रखडले होते. ते सुरू व्हावे, यासाठी पूर्वीपासूनच राजकारण पेटले होते. कधी पालकमंत्री एकनाथ शिंदे तर कधी आमदार संजय केळकर यांच्यात श्रेयाची लढाई सुरू असल्याचे दिसून आले. या पुलाचा सुरुवातीला खर्च नऊ कोटी होता. परंतु, आता त्याच कामासाठी २०० कोटींहून अधिकच खर्च केला जाणार आहे. श्रेयवादात पुलाचा खर्च वाढल्याबाबत मात्र हे दोन्ही नेते मिठाची गुळणी धरून बसले आहेत. या पुलाच्या कामाच्या भूमिपूजनाच्या जाहिराती सोमवारी सर्वच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या. परंतु, त्या जाहिरातींत पालकमंत्र्यांना डावलण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्याच अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असताना त्यांनाच डावलल्याने कार्यक्रमस्थळी उलटसुलट चर्चेस उधाण आले होते. शेजारील पालघरमध्ये युतीत निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद उमटू लागल्याची चर्चाही रंगली होती.

कोपरी पुलाचे भवितव्य रेल्वेच्या हाती, पहिल्या टप्प्याच्या कामाला आजपासून सुरुवात

कोपरी पुलाच्या फेज-१ आणि फेज-२ साठी ३६ महिन्यांचा काळ लागेल. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. संबंधित ठेकेदाराला एप्रिल महिन्यातच या कामाचे कार्यादेश दिले आहेत. या कामाचा एकूण खर्च २५८.७६ कोटी अपेक्षित आहे. यापैकी रेल्वेच्या परिसरातील कामाचा खर्च हा ९० कोटी आहे. पुलाची लांबी ही ७७६ मीटर असून रुंदी ३७.४० मीटर एवढी असणार आहे. यापैकी रेल्वे पुलाची लांबी ही ६५ मीटरची अपेक्षित धरली आहे. फेज-१ चे काम हे मंगळवारपासून सुरू होणार असून या कामाच्या वेळेसच ज्ञानसाधना महाविद्यालय ते भास्कर कॉलनी भुयारीमार्गाच्या कामास सुरुवात होणार आहे. यामुळे तीनहातनाक्यावर होणारी अनावश्यक वाहतूककोंडी टळणार आहे. तसेच आनंदनगर येथील भुयारी मार्गाचेदेखील मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या भुयारी मार्गातून दुचाकी, चारचाकी वाहने जातील. यासाठी तीनहातनाक्याजवळ स्नव्या स्कायवॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर जुना स्कायवॉक तोडण्यात येणार आहे.

मुलुंड टोलनाका ओलांडल्यानंतर कोपरी रेल्वे पूल केवळ चारपदरीच असल्यामुळे तेथे वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे या पुलाच्या रूंदीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले होते. कोपरी येथील जुन्या लेनऐवजी वाढीव पूल करण्यात येणार आहे. डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने बाहेरून ते सुरू राहणार असल्याने सध्याच्या मार्गिका या खुल्या राहणार आहेत.

कोंडी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था : पुलाचे काम सुरू असताना वाहतूककोंडी टाळण्यासाठी कोपरी आणि जकातनाका परिसराची पाहणी केल्यानंतर पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे ठाण्यातून जाणारी बरीचशी वाहतूक मुलुंड पश्चिममार्गे वळवता येणे शक्य होणार आहे.

रेल्वेवर सारी भिस्त : एमएमआरडीएने ३६ महिन्यांत दोन फेजमध्ये हे काम पूर्ण करण्याचा दावा केला आहे. यात रेल्वेचा अडसर ठरू शकतो, अशी शंका काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. तीनहातनाक्याकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून ठाण्याकडे येणाºया फेज-१ आणि २ चे काम एमएमआरडीए रेल्वे ब्रिजपर्यंत करेल. परंतु, रेल्वेवरील ब्रिजचे काम हे रेल्वेकडूनच होणार आहे. यासाठी ९० कोटींचा निधीदेखील रेल्वेकडे वर्ग केला आहे. परंतु, रेल्वेच आता या पुलाच्या मधील दुवा असल्याने त्यांच्याकडून हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पालघर पोटनिवडणुकीमुळेच ‘दिवार’
कार्यक्रमाच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपामध्ये संघर्ष सुरू असताना काही मिनिटे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेथे पोहोचले. पालकमंत्री शिंदे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उपस्थितीची दखल न घेता ते तडक भूमिपूजन कार्यक्रम होणार असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे शिंदे हे लगबगीने तेथे गेले. पालघर लोकसभा पोटनिवडँणुकीत भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास याला शिवसेनेने उमेदवारी दिली असून त्यांच्या विजयासाठी शिंदे यांनी कंबर कसली आहे. सहाजिकच पालघरमध्ये शिवसेनेवर विश्वासघाताची टीका केल्यानंतर ठाण्यात गळ््यात गळे घालणे मुख्यमंत्र्यांना रूचलेले नसावे. त्यामुळे त्यांनी आपली नाराजी कृतीतून दाखवून दिल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. शहराच्या विविध भागांत पालकमंत्री आणि भाजपाच्या आमदारांचे श्रेय घेणारे फलक लागले असून त्यांनीच मुख्यमंत्र्यांचे स्वागत झाले. त्या फलकांमध्ये केवळ आमच्यामुळेच हे काम सुरू झाल्याचा दावा पालकमंत्री शिंदे आणि भाजपाचे आमदार केळकर यांनी केला आहे. त्याचेच पडसाद या सोहळ््यात उमटल्याचे दिसले.

Web Title: From Kopri bridge to Shivsena-BJP, Kalgitura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.