कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ: सहा हजार नव्या मतदारांची नोंदणी तर ३०० मतदारांचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 09:10 PM2019-09-24T21:10:45+5:302019-09-24T21:25:18+5:30
ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात विशेष पुनर्रनिरीक्षण कार्यक्रमाद्वारे सहा हजार नवयुवकांनी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदारयादीमध्ये नोंदणी केली आहे. तर गेल्या सहा महिन्यात सुमारे ३०० मतदारांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची नावे मतदारयादीतून वगळल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात नविन सहा हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. तर ३०० मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे वगळण्यात आली. या मतदारसंघामध्ये तीन लाख ५१ हजार ५०९ मतदार आहेत. यातील ४२ हजार ८४७ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र नसून मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी वागळे इस्टेट, रामनगर, आयटीआयच्या कार्यशाळा क्रमांक एक येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
३१ आॅगस्ट २०१९ रोजी नव्याने प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीनुसार या मतदारसंघामध्ये एक लाख ९३ हजार ७४ पुरुष, एक लाख ५८ हजार २९१ महिला, १३४ सैनिक तर दहा इतर अशा तीन लाख ५१ हजार ५०९ मतदारांची संख्या आहे. त्यातील ४२ हजार ८४७ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्राचा अभाव आहे. सुमारे ८७ टक्के म्हणजे तीन लाख आठ हजार ८६२ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र असल्याचा दावाही तामोरे यांनी केला. मतदारयादीमध्ये तीन लाख पाच हजार १३८ मतदारांचे छायाचित्र आहे. तर ४६ हजार २३७ म्हणजे १३ टक्के मतदारांचे छायाचित्र यादीमध्ये नाही.
* एकूण ३७० मतदानकेंद्र
वयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी ३७० पैेकी २५९ मतदानकेंद्र ही तळमजल्यावर आहे. उर्वरित १५ पहिल्या, सहा दुसऱ्या तर ९० केंद्र ही मंडपामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. यातील ७८७ दिव्यांग मतदारांपैकी ७६६ मतदारांना तळमजल्यावर तर १७ मतदारांना पहिल्या आणि अवघ्या चार मतदारांना दुसºया मजल्यावर मतदानाची सुविधा केली आहे.
........................
तीन हजार ५०० मतदारांच्या नावात दुरुस्ती
अलिकडेच १५ जुलै ते ३१ आॅगस्ट २०१९ या कालावधीमध्ये जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारयादीसाठी विशेष पुनर्रनिरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी सुमारे तीन हजार ५०० मतदारांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरुन नावात दुरुस्ती केली. गेल्या सहा महिन्यात सुमारे ३०० मतदारांचा मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितल्यानुसार त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. तर सहा हजार नवयुवकांनी मतदार यादीमध्ये मतदानाचा हक्क बजविण्यासाठी नोंदणी केल्याचे तामोरे यांनी सांगितले.
.........................
दोन हजार २२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
या मतदारसंघात ३७० मतदानकेंद्र असून त्याठिकाणी निवडणूकीच्या कार्यक्रमासाठी मतदानकेंद्र अधिकारी कर्मचारी, शिपाई आणि पोलीस कर्मचारी असे दोन हजार २२० कर्मचारी याठिकाणी तैनात केले आहेत.
.........................
आयटीआयमध्ये मतमोजणी
रामनगर येथील आयटीआयच्या कार्यशाळेमध्ये कोपरी पाचपाखाडी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असून त्याठिकाणी उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे, मतमोजणी आणि इव्हीएमच्या स्ट्राँगरुमची व्यवस्था करण्यात आली आहे.
....................
गडकरी रंगायतनमध्ये होणार प्रशिक्षण
मतदान अधिकारी यांच्यासाठी २७ सप्टेंबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे पहिले तर ११ आणि १२ आॅक्टोंबर रोजी दुसरे प्रशिक्षण आयटीआय वागळे इस्टेट येथे होणार आहे.