कोपरी पोलीस ठाण्यासाठी एक कोटींचा निधी?
By admin | Published: July 30, 2015 01:56 AM2015-07-30T01:56:15+5:302015-07-30T01:56:15+5:30
शहराच्या पूर्व भागातील कोपरी पोलीस ठाण्याच्या निर्मितीपासूनच भाड्याच्या जागेत कारभार सुरू आहे. या पोलीस ठाण्याला हक्काची जागा मिळण्यासाठी कोपरी पोलीस
- जितेंद्र कालेकर, ठाणे
शहराच्या पूर्व भागातील कोपरी पोलीस ठाण्याच्या निर्मितीपासूनच भाड्याच्या जागेत कारभार सुरू आहे. या पोलीस ठाण्याला हक्काची जागा मिळण्यासाठी कोपरी पोलीस वसाहतीच्या बाजूलाच जागाही निश्चित करण्यात आली आहे. मात्र, इमारतीच्या बांधकामासाठी एक कोटीच्या निधीची गरज असल्याचे पत्र पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृह मंत्रालयाला दिले आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतरच या पोलीस ठाण्याच्या नवीन वास्तूचा मार्ग मोकळा होणार आहे.
वागळे इस्टेट परिमंडळातील कोपरी पोलीस ठाणे हे निर्मितीपासूनच ‘दिनेश को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’ या इमारतीच्या तळ मजल्यावर भाड्याच्या जागेत सुरू आहे. त्यापोटी पोलीस आयुक्तालयातर्फे महिना ४४ हजार ५२५ रुपये भाडे मोजावे लागते. कामकाज आणि मनुष्यबळाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत अपुरी आणि गैरसोयीची आहे. आता ‘दिनेश’ इमारतीची पुनर्बांधणी करायची असल्यामुळे घरमालकाने पोलीस ठाण्यासह सर्वांनाच सदनिका रिक्त करण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून कोपरी पोलीस वसाहतीच्या बाजूला मोकळ्या जागेची पाहणी भूमापन अधिकाऱ्यांनीही केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याजागी पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी एक कोटी १० हजारांच्या खर्चाच्या अंदाजाचा प्रस्ताव ठेवला आहे. जागेला प्रशासकीय मान्यता आणि निधी मिळविण्यासाठी पोलीस आयुक्त सिंग यांनी २३ जुलै २०१५ रोजी गृह विभागाकडे पत्रही दिले आहे. गृह विभागाने निधीला मंजुरी दिल्यास कोपरी पोलिसांना हक्काची जागा मिळणार आहे. अर्थात, तोपर्यंत गळक्या आणि पडक्या इमारतीच्या वास्तूमध्येच हा कारभार करावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.