कोपरीचा रेल्वे उड्डाणपूल धोक्याचा?, दररोज ८ हजार वाहनांची येजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:49 AM2017-08-12T05:49:50+5:302017-08-12T05:49:50+5:30
ठाणे शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा कोपरी येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. या पुलावरून दररोज आठ हजारांहून अधिक वाहनांची वाहतूक होते.
डोंबिवली : ठाणे शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा कोपरी येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. या पुलावरून दररोज आठ हजारांहून अधिक वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे या पुलाची तातडीने डागडुजी करणे गरजेचे आहे, असे पत्र मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय अधिकाºयांनी नुकतीच या पुलाची पाहणी केली. त्या वेळी त्यांना पुलाच्या खालच्या बाजूचे निघालेले प्लास्टर, गंज पकडलेल्या लोखंडी सळ्या दिसल्या. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुलाची तातडीने डागडुजी आवश्यक असून त्यासाठी विशेष ट्रॅफिकब्लॉक घेण्याची गरज आहे, असे अभियंत्यांनी या पत्रात म्हटले आहे. मात्र, ट्रॅफिकब्लॉक मिळत नसल्याने डागडुजी रखडल्याचे उघड झाले आहे.
कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव १२ वर्षांपासून रखडला आहे. पूल कमकुवत होण्यामागे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. एमएमआरडीएने त्याची दखल घ्यावी, असे मत जाणकारांनी व्यक्त केले. या पुलाचे रुंदीकरण झाल्यास पुलावरील ताण कमी होईल. डागडुजीलाही वाव मिळेल. साहजिकच पुलाचे आयुष्यमान वाढेल. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरच्या उंचीच्या तांत्रिक बाबीमुळे या पुलाचे नूतनीकरण रखडले होते. मात्र, रेल्वेने तो मुद्दा मार्गी लावल्याने पुलाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. पण, त्याच्या शुभारंभाबाबत अनिश्चितता आहे.
कोपरी पूल धोकादायक बनल्याबाबत रेल्वेच्या अभियंत्यांनी वरिष्ठांकडे पत्र दिले आहे. पण, असे असले तरीही पुलाला फार धोका नाही. ज्या भागात प्लास्टर निघाले आहे आणि जेथे देखभालीची गरज आहे, ती कामे तातडीने केली जाणार आहेत. त्यासाठी लवकरच ट्रॅफिकब्लॉक घेतला जाईल.
- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे