आव्हाड यांच्या मतदारसंघातील कोविड सेंटर अखेर होणार बंद, म्हाडाने मागितले २.६६ कोटींचे भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 07:31 AM2020-12-20T07:31:20+5:302020-12-20T07:31:44+5:30
Thane : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कळवा आणि मुंब्य्रातील रुग्णांनाही ठाण्यात धाव घ्यावी लागत होती.
ठाणे : म्हाडाने गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा आणि मुंब्रा या मतदारसंघात उभारलेले कोविड सेंटर अवघ्या तीनच महिन्यांत बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. म्हाडाने येथे केवळ रुग्णालय उभारले असून, त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ, साहित्य, जेवण, मेडिसिन, ऑक्सिजन आदींसह इतर पुरवठा ठाणे महापालिका आपल्या खर्चातून करीत आहे. असे असताना तीन महिन्यांनंतर या दोन्ही रुग्णालयांचे दोन कोटी ६६ लाखांचे भाडे म्हाडाने मागितल्याने हे कोविड सेंटरच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कळवा आणि मुंब्य्रातील रुग्णांनाही ठाण्यात धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे कळव्यात आणि मुंब्य्रातही म्हाडाने तीन महिन्यांपूर्वी ही रुग्णालये उभारली होती. म्हाडाच्याच जागेवर ती होती. त्यानुसार, कळवा येथे ४०० आणि मुंब्रा येथे ४१० असे एकूण ८१० बेड या दोन्ही रुग्णालयांमध्ये होते. याची निगा देखभाल, या ठिकाणी लागणारे डॉक्टरांसकट इतर मनुष्यबळ महापालिकेने पुरविले होते, तसेच त्यांचा खर्चही महापालिका करीत आहे.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या महासभेत या रुग्णालयांच्या ठिकाणी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पुरविणे आणि हाउसकीपिंग पुरविणे असे दोन प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आले होते. त्यावर चर्चा करताना एवढा सगळा खर्च महापालिका करीत असताना, आता पुन्हा म्हाडाने जे काही स्ट्रक्चरल उभे केले आहे, त्याचे भाडे मागितले आहे, ते का द्यावे, असा सवाल या वेळी माजी सभापती राम रेपाळे यांनी केला.
मंत्र्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष
सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ही रुग्णालयेच बंद करावीत, असा ठराव त्यांनी मांडला त्याला अनुमोदन देण्यात आले. महापौरांनीही महापालिकेने भाडे देण्यास आक्षेप घेऊन ती बंद करावीत, असे आदेश प्रशासनाला दिले. आता आव्हाड या बाबत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.