अंबरनाथ पालिकेचे कोविड रुग्णालय रेमडेसिविरच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:40 AM2021-04-21T04:40:17+5:302021-04-21T04:40:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथमधील सहा खाजगी कोविड रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी अंबरनाथ पालिकेचे पथक काम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथमधील सहा खाजगी कोविड रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी अंबरनाथ पालिकेचे पथक काम करीत आहे. ज्या पथकाच्या माध्यमातून काम सुरू आहे त्याच पालिकेच्या कोविड रुग्णालयाला रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याची बाब उघड झाली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात ८० हून अधिक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, त्यातील बहुसंख्य रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासते. मात्र, अंबरनाथ नगरपालिकेकडे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने त्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना मुबलक प्रमाणात इंजेक्शन देता येत नाही. हीच परिस्थिती अंबरनाथ शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांची झाली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कोविड रुग्णालयांना आवश्यक असलेल्या इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासनावर जबाबदारी सोपविली आहे. पालिकेच्या वतीने खाजगी रुग्णालयातील ज्या रुग्णांना इंजेक्शनची गरज भासत आहे ते उपलब्ध करून देण्यासाठीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दररोज पाठविला जातो. पालिकेने पाठविलेल्या अहवालानुसार इंजेक्शन उपलब्धही होत आहेत. मात्र, ज्या पालिकेकडे खाजगी रुग्णालयातील रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्याच पालिकेच्या रुग्णालयात इंजेक्शनच्या अभावामुळे रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. जिल्हाधिकारी खाजगी रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारत असताना पालिकेच्या रुग्णालयाला इंजेक्शन कोण उपलब्ध करून देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे पालिकेला किती इंजेक्शनची गरज आहे याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली जाते. मात्र, पालिकेच्या रुग्णालयांना एकही इंजेक्शन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध होत नसल्याची बाब समोर आली आहे. जे काही इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत ते पालिकेने स्वतः विकत घेतले असून, इतर वाढीव साठा उपलब्ध होण्यासाठीही खाजगी संस्थेकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, सरकारी रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने पाच हजार इंजेक्शन खरेदीचा प्रस्ताव आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्याप इंजेक्शन उपलब्ध झालेले नाही, तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही इंजेक्शनची मागणी करण्यात आलेली आहे.
- प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी.
-----------------