डोंबिवलीच्या तरुणाने तयार केला कोविड रोबोट; केडीएमसी रुग्णालयास केला सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 01:47 AM2020-05-30T01:47:31+5:302020-05-30T01:47:39+5:30
लॉकडाउनच्या काळात खासदारांनी केली होती मदत
कल्याण : कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्याची लागण वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही होत आहे. त्यामुळे मनुष्यबळही कमी पडत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी डोंबिवलीतील तरुण प्रतिक तिरोडकर याने कोविड रोबोट तयार केला असून तो महापालिका रुग्णालयाला देण्यात आला आहे. हा रोबोट रुग्णांना गरम पाणी, सॅनिटायझिंगची कामे करू शकत असल्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा रुग्णांसोबतचा संपर्क टाळता येऊ शकणार आहे.
लॉकडाउनमध्ये रोबोट तयार करण्यासाठी लागणारी तांत्रिक साधनसामग्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मेड इन इंडिया असलेला हा रोबोट कल्याण-डोंबिवली महापालिकेस सुपूर्द करण्यात आला आहे. तो महापालिकेच्या कोविड रुग्णालयात सुरू केला जाणार आहे.
तिरोडकर हे डोंबिवलीत सुनीलनगरमध्ये राहतात. त्यांनी भारती विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. रोबोट तयार करण्यात त्यांचे खास प्रावीण्य आहे. यापूर्वी त्यांनी अनेक रोबोट तयार केले आहेत. मात्र, कोरोनाच्या काळात कोरोना रुग्णाचा संपर्क टाळण्यासाठी खास करून कोविड रोबोट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. ही बाब खासदार शिंदे यांना कळताच त्यांनी त्यांना मदत केली.
भारतात जपान आणि चीनवरून रोबोट आयात केले जातात. तिरोडकर यांनी भारतीय बनावटीचा कोविड रोबोट तयार केला आहे. मेड इन चायनाचा रोबोट चार ते पाच लाखांना पडतो. भारतीय बनावटीचा रोबोट दीड ते दोन लाखांना तयार करता येऊ शकतो. या रोबोटद्वारे एकाच वेळी १० ते १५ रुग्णांना गरम पाणी दिले जाऊ शकते. सॅनिटायझिंगचे काम करू शकतो. जेवण देऊ शकतो. त्यामुळे पॅरामेडिकल स्टाफला रुग्णांच्या संपर्कात न जाता रोबोटच्या माध्यमातून सेवा देणे शक्य होईल, असा दावा तिरोडकर यांनी केला आहे. या रोबोटचे प्रात्यक्षिक खासदार शिंदे यांच्यासह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनीता राणे यांच्या उपस्थित करण्यात आले.
बहुउपयोगी रोबोट - शिंदे
खासदार शिंदे म्हणाले की, रुग्ण आणि मेडिकल रेशो यांचे प्रमाण व्यस्त आहे. त्यावर मात करण्यासाठी हा कोविड रोबोट चांगला उपाय ठरणार आहे. मनुष्यबळाची बचत या रोबोटमुळे होऊ शकते. तसेच कोरोनामुळे होणारी लागणही टाळता येऊ शकते. रुग्णालयातील पॅरामेडिकल स्टाफ कोरोनाच्या विळख्यात असून त्यावर या रोबोटद्वारे मात करता येऊ शकते.