कोविडचा लढा पुनश्च सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:13 AM2021-03-13T05:13:29+5:302021-03-13T05:13:29+5:30
कल्याण : कोविडचा लढा पुन्हा सुरू झाला आहे. या लढ्यात सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. ...
कल्याण : कोविडचा लढा पुन्हा सुरू झाला आहे. या लढ्यात सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आय.एम.ए. निमा, केम्पा आणि होमिओपॅथिक असोसिएशन या संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. कोविड उपाययोजनांबाबत बुधवारी प्रथम बैठक झाली. मागील काही दिवसांपासून कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत रूपरेषा ठरविण्यासाठी गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यात रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत सखोल चर्चा झाली. तसेच सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रुग्णालयांना गाइडलाइन ठरवून देण्याचे सांगण्यात आले. कोविड टेस्टिंग वाढविण्यासाठी चाचणी केंद्रे वाढविणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केल्यावर सूर्यवंशी यांनी त्यास सहमती दर्शविली.
कोविड रुग्णांचे निदान त्वरित व्हावे, यासाठी तापाचे दवाखाने पुन्हा पूर्ण कार्यक्षमतेने सुरू करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोविडची लक्षणे असलेला रुग्ण गंभीर आजारी झाल्यास आणि त्याची कोविडची चाचणी केलेली नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डॉक्टरवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
एखाद्या रुग्णाच्या सिटी स्कॅनमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास परंतु, त्यास त्रास होत नसेल, तरीही त्यास संशयित रुग्ण म्हणून क्रीडासंकुलातील कोविड सेंटरमध्ये दाखल करावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिल्या. या बैठकीस मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, सहायक आयुक्त अनिल पोवार, मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके, शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुहासिनी बडेकर, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समीर सरवणकर उपस्थित होते.
-------------------