केडीएमसीच्या आरोग्य केंद्रांत आता सायंकाळीही ओपीडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:41+5:302021-09-22T04:44:41+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रात आता सायंकाळीही ओपीडी सुरू ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रात आता सायंकाळीही ओपीडी सुरू ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मागील दीड वर्षापासून मनपा कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचे लक्ष्य मनपाने ठेवले आहे. मनपा रुग्णालयांत उपचारासाठी नागरिकांची गर्दी होत असून, ती टाळण्यासाठी नागरी आरोग्य केंद्रे आता सायंकाळी ५ ते ७ दरम्यान खुली ठेवण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे.
कल्याणमधील महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र, चिकणघर नागरी आरोग्य केंद्र, मोहना नागरी आरोग्य केंद्र, कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्र, तिसगाव नागरी आरोग्य केंद्र, खडेगोळवली नागरी आरोग्य केंद्र तसेच डोंबिवलीतील पाटकर, मढवी, दत्तनगर, महाराष्ट्र नगर या नागरी आरोग्य केंद्रांवर ओपीडी सुरू राहणार आहे.
मंजूनाथ आरोग्य केंद्र लवकरच नवीन वास्तूत
डोंबिवलीतील मंजूनाथ नागरी आरोग्य केंद्र लवकरच नवीन मोठ्या जागेत स्थलांतरित होत आहे. त्यानंतर तेथेही ओपीडी सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.
--------------------------