कुणबी समाजाचा धक्का? भाजपाविरोधातील नाराजी व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 04:42 AM2017-12-16T04:42:39+5:302017-12-16T04:43:47+5:30
कुणबी समाजाच्या आरक्षणात वाटेकरी निर्माण करण्याच्या हालचाली आणि त्या समाजाची उपजीविका असलेल्या शेतीवर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याच्या भावनेतून या समाजाने ठाणे जिल्ह्यातील भाजपाच्या विजयाची लाट रोखल्याचे भाजपातील राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
ठाणे : कुणबी समाजाच्या आरक्षणात वाटेकरी निर्माण करण्याच्या हालचाली आणि त्या समाजाची उपजीविका असलेल्या शेतीवर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याच्या भावनेतून या समाजाने ठाणे जिल्ह्यातील भाजपाच्या विजयाची लाट रोखल्याचे भाजपातील राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. जेथे या समाजाचे नेते भाजपाचे नेतृत्त्व करत होते, तेथे पक्षाला कमी फटका बसला. मात्र अन्य समाजाच्या नेत्यांना या समाजाने अंतरावर ठेवल्याचे त्यांचे प्र्नाथमिक निरीक्षण आहे.
त्यामुळे भाजपाचे खासदार कपिल पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांना पुढील काळात राजकारणाची दिशा बदलून प्रचंड मेहनत घ्यावी लागण्याची वेळ येणार आहे. भाजपाच्या आक्रमक राजकारणामुळे विरोधकांना एकत्र येण्याची संधी मिळाल्याने पक्षाला काम करण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल करावे लागण्याची परिस्थिती येऊन टेपली आहे.
भिवंडी, शहापूर आणि काही प्रमाणात मुरबाड तालुक्यात या समाजाने आपली नाराजी दाखवून दिल्याने समृद्धीसह वेगवेगळ््या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकारला वेगळी भूमिका घ्यावी लागण्याची, सध्याच्या भूमिकेत बदल करण्याची वेळ आल्याचा सल्लाही त्यांनी दिला.
ग्रामीण राजकारणातील आगरी विरूद्ध कुणबी हा सुप्त राजकीय संघर्ष या निवडणुकीतून तीव्रपणे समोर आला. सतत लादल्या जाणाºया विविध प्रकल्पांमुळे हा समाज नाडला जात असल्याची भावना तीव्रपणे मतपेटीतून व्यक्त झाल्याने भाजपाच्या आपल्या राजकारणाचा तोंडवळा बदलावा लागण्याची चिन्हे आहेत. वेगवेगळ््या प्रकल्पांच्या घोषणा झाल्या असल्या, तरी मतदारांना ठोस काम दिसत नसल्याने त्यांच्यात घोषणाबाजीबद्दल असलेली नाराजीही व्यक्त झाली. भाजपाला केवळ जिल्हा परिषदेतच फटका बसला, असे नव्हे तर चार पंचायत समित्याही पक्षाच्या हातून गेल्याने त्याचा फटका दीर्घकाळ सोसावा लागेल.
पाटील-कथोरे
यांच्यात ‘संघर्ष’
राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नेत्यांपैकी कपिल पाटील हे खासदार झाले, तर किसन कथोरे आमदार. त्यातील पाटील यांना भिवंडी महापालिका, ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी पंचायत समितीच्या राजकारणात हवे तसे यश मिळाले नाही.
पण शिवसेना-राष्ट्रवादीची युती असूनही कथोरे यांनी मुरबाडची पंचायत समिती राखली.
अंबरनाथ पंचायत समितीत त्यांना फटका बसला असला तरी त्यातील पक्षाच्या धोरणांचा आणि काही कार्यकर्त्यांचा ‘वाटा’ मोठा आहे. त्यामुळे या दोन नेत्यांतील सुप्त संघर्षात कथोरे यांची सरशी झाल्याचे मानले जाते.
आदिवासी अध्यक्ष, तर उपाध्यक्ष कुणबी समाजाचा
आरक्षणानुसार यंदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आदिवासी समाजातील महिलेला मिळेल. त्यासाठी शिवसेनेने भिवंडी, शहापूर, मुरबाडमधून विविध नावांचा विचार केला. पण चर्चेत आलेल्या नावांपैकी काही शिवसेनेचे समर्थन दिलेली, तर काही निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या वाटेवर आलेली नावे असल्याने त्यात बदल करावा, अशी मागणी सुरू आहे. त्यातही पुन्हा निष्ठा आणि कट्टर शिवसैनिकाचा न्याय लावावा, अशी चर्चा पक्षात सुरू आहे. त्याचवेळी श्रमजीवी संघटनेने निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला साथ दिल्याने शिवसेनेने आदिवासी समाजात स्वत:चे स्थान निर्माण करून पर्याय शोधायला हवा आणि तोच विचार करून अध्यक्षपदाचा उमेदवार द्यावा, असाही मतप्रवाह आहे.
शिवसेनेकडून आदिवासी समाजाला स्थान मिळणार असल्याने उपाध्यक्षपद मिळवणाºया राष्ट्रवादी काँग्रेसने या पदासाठी आधी शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा मुलगा निखिल याचे नाव पुढे केले होते. पण कुणबी राजकारणाचा फॅक्टर चालवायचा असेल आणि मुरबाडच्या राजकारणात आमदार किसन कथोरे यांना शह द्यायचा असेल तर माजी आमदार गोटीराम पवार यांचा मुलगा सुभाष यांना ते पद द्यावे, अशा निर्णयाप्रत नेते आल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत आणि नेत्यांशी प्रमोद हिंदुराव यांचे चांगले संबंध असले, तरी स्थानिक राजकारणाशी त्यांची नाळ तुटत चालल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले. त्यामुळे त्यांनाही कल्याण की मुरबाडचे राजकारण याबाबत एकदा निर्णय घ्यावा लागेल.
शिवसेनेशी सतत लढत देणाºया पांडुरंग बरोरा यांनी तेथे राष्ट्रवादी-शिवसेना युतीला विरोध केला होता. अन्यत्र या दोन पक्षांचे असलेले संबंध त्यांच्या मतदारसंघात फारसे मधूर नाहीत. त्याचा फटका त्यांना आगामी राजकारणात बसेल. शिवाय जिल्हा परिषदेच्या राजकारणावर प्रभाव टाकण्यातही त्यांना अडथळे येऊ शकतात.
किसन कथोरे यांनी मुरबाडच्या राजकारणावर पकड मिळवली असली, तरी अंबरनाथच्या राजकारणात शिवसेनेने त्यांना मात दिल्याचेही निकालातूून स्पष्ट झाले. त्यांना तेथील राजकारणाचा फेरआढावा घ्यावा लागेल किंवा तेथील राजकारणातून अंग काढून घ्यावे लागेल.
शिवसेनेच्या यशात आयारामांचा मोठा वाटा
भिवंडी तालुक्यात शिवसेनेने २१ पैकी १८ जागा लढवल्या. त्यातील नऊ उमेदवार आयाराम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले. कोन गटात शिवसेनेचे ग्रामीण संपर्कप्रमुख बाळ््यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. ते गुंदवलीचे रहिवासी असूनही कोन गटातून उमेदवारी दिल्याने शिवसेनेत नाराजी होती. त्यांनी शिवसेना, मनसे, भाजप आणि पुन्हा शिवसेना असे राजकीय प्रवासाचे वर्तुळ पूर्ण केले आहे. मनसेतून त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढविली होती. तेथून आता ते जिल्हा परिषदेच्या राजकारणात उतरले आहेत. काँग्रेसमधून आलेले कुंदन तुळशीराम पाटील यांना पूर्णा येथून संधी मिळाली.
काँग्रेसमधून आलेल्या महादेव घरत यांना अंजूर, मनसेतून आलेल्या नीता प्रदीप पाटील यांना राहनाळ, काँग्रेसमधून आलेले माजी सभापती गोकूळ नाईक यांना कारिवली, भाजपामधून आलेल्या वैशाली विष्णू चंदे यांना बोरिवली तर्फे राहूर, राष्ट्रवादीतून आलेल्या दिपाली दिलीप पाटील यांना मोहंडूळ, भाजपामधून आलेल्या लहू थापड यांना गणेशपूरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश भोईर यांची पत्नी उज्ज्वला यांना कवाडमधून शिवसेनेने उमेदवारी दिली.
बाळ्यामामांचा
प्रभाव राहणार
शिवसेनेतून निवडून आलेले एक-दोन सदस्य वगळता अन्य सदस्य अननुभवी आहेत. त्यातही सव्वातीन वर्षे जिल्हा परिषद अस्तित्त्वातच नसल्याने कामकाजाचा काहीच अनुभव सदस्यांना नाही. त्यातही प्रकाश पाटील यांचा पराभव झाल्याने वेगवेगळ््या पक्षातून येऊन आता शिवसेनावासी झालेले बाळ््यामामा यांच्याकडेच जिल्हा परिषदेच्या राजकारणाची सूत्रे राहतील. वेगवेगळ््या मार्गाने घडी बसवण्याचा त्यांचा दांडगा अनुभव पाहता जिल्हा परिषदेचे राजकारण त्यांच्या हाती ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे दिसते.