ठाण्यात स्वतंत्र आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुणबी सेनेचे आंदोलन!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 04:36 PM2022-11-28T16:36:40+5:302022-11-28T16:37:08+5:30
गेल्या बावीस वर्षांपासून कुणबी सेनेच्या माध्यमातून आरक्षणासाठी लढा सुरू ठेवला आहे. या संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी आज एकत्र येत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले.
ठाणे - जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी जोरदार निदर्शन केली. कुणबी सेनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहा समोर एकत्र येऊन आंदोलन छेडले.
गेल्या बावीस वर्षांपासून कुणबी सेनेच्या माध्यमातून आरक्षणासाठी लढा सुरू ठेवला आहे. या संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी आज एकत्र येत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले. या संघटनेच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. कुणबी समाजात ३७० जातींचा समावेश असून त्यांचे अस्तित्व आज संपत असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
साकेत येथून निघालेला हा मोर्चा शासकीय विश्रामगृहा समोर एकत्र आला. २००९पासून आलेल्या पेसा कायद्यामुळे राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात राहणाºया कुणबी समाजासह सर्वच ओबीसीचे आरक्षणाचे प्रमाण शून्यावर आले आहे. त्यामुळे कुणबी समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी लढा उभारण्यात येणार आहे. या लढ्याचे रणशिंग आजच्या या आंदोलनामुळे फुंकण्यात आले. यासाठी येथील गडकरी रंगायतन येथे राज्यवापी आरक्षण परिषदही घेऊन पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.