कुरुंद, डोहाळे ग्रामपंचायती भाजपाकडे, भादाणे सेनेकडे
By admin | Published: November 14, 2015 11:52 PM2015-11-14T23:52:04+5:302015-11-14T23:52:04+5:30
भिवंडी तालुक्यातील कुरुंद व डोहाळे या गोडाऊन पट्ट्यातील ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश आले आहे.
पडघा : भिवंडी तालुक्यातील कुरुंद व डोहाळे या गोडाऊन पट्ट्यातील ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश आले आहे. मात्र, भादाणे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
कुरुंद ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाकरिता शिवसेना व भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. महिलांकरिता आरक्षित असलेल्या सरपंचपदाकरिता श्रेया गायकर तर उपसरपंचपदाकरिता नीळकंठ विशे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. ऐन वेळेस अपक्ष उमेदवारांना भाजपाने आपल्याकडे वळविल्यामुळे गायकर यांची सरपंचपदी तर विशे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी पी.डी. सासे यांनी घोषित केले. डोहाळे ग्रामपंचायतीमध्ये सत्तासंघर्ष पाहावयास मिळाला. शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार असलेल्या दर्शना दत्तात्रेय ठाकरे यांना ऐनवेळेस उमेदवारी नाकारल्याने ठाकरे यांच्यासमवेत शिवसेनेच्या एका गटाने सरपंचपदाची उमेदवारी दाखल करण्याच्या काही वेळ अगोदरच भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाकडून त्यांना थेट सरपंचपदाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्यात आले. मात्र, ऐनवेळेस आपल्यामधील एका गटाने भाजपात प्रवेश केल्याने सत्तेजवळ असलेल्या शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळच न उरल्याने ठाकरे यांची सरपंचपदी तर दानीश शेख यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. भादाणे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविल्याने शिवसेनेच्या सुनीता सुभाष कथोरे यांची सरपंचपदी तर हनुमान गीते यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.