भिवंडीत महापालिका प्रशासना विरोधात लेबर फ्रंटचा प्रांत कार्यालयावर मोर्चा
By नितीन पंडित | Published: November 9, 2023 05:24 PM2023-11-09T17:24:51+5:302023-11-09T17:25:49+5:30
अर्थसंकल्पात मागील वर्षी ४ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद असताना ११ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान दिले होते.
भिवंडी : महानगरपालिकेतील कामगार संघटनांच्या कृती समितीने पालिका प्रशासन सोबत केलेल्या चर्चेत कामगारांना दिवाळीपूर्वी १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती.परंतु भिवंडी पालिका प्रशासनाने कृती समिती मधील काही मोजक्या कामगार संघटनांना हाताशी धरून घाईघाईत १३ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली .या विरोधात लेबर फ्रंट कामगार युनियन सोबत मनसे महानगरपालिका कामगार संघटना व अखिल भारतीय मजदुर काँग्रेस संघटनेच्या सदस्य कामगारांनी विरोध केला असून पालिकेच्या या मनमानी कारभारा विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर लेबर फ्रंटचे अध्यक्ष ऍड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वा खाली गुरुवारी मोर्चा काढून पालिका प्रशासनाचा धिक्कार केला आहे.यावेळी मनपा प्रशासन व मनपा आयुक्त अजय वैद्य यांचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात संतोष चव्हाण ,मनसे महानगरपालिका कामगार संघटनेचे संतोष साळवी,अखिल भारतीय मजदुर काँग्रेस संघटनेचे राजू चव्हाण यांसह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.
अर्थसंकल्पात मागील वर्षी ४ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद असताना ११ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. तर यावेळी अर्थसंकल्पात ६ कोटी रुपयांची तरतूद केल्याने पालिकेतील ४२२५ कामगारांना १४ हजार २०० रुपयांची तरतूद केली आहे.त्यामध्ये एक हजार रुपये वाढ करून १५ हजार २०० रुपयांची मागणी केली असताना,काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून प्रशासना कामगारांची फसवणूक करीत असल्याचा आरोप करीत येत्या दोन दिवसात प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर ऐन दिवाळीत कामगार काम बंद आंदोलन करतील असा इशारा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात अँड किरण चन्ने यांनी दिला आहे .