पैसे मागणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची तक्रार करण्याचे कामगार सेनेचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 07:29 PM2020-01-15T19:29:48+5:302020-01-15T19:30:03+5:30
जाहिर फलकामुळे पालिकेतील खाऊ विकृती चव्हाट्यावर ?
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयातील मीरा भाईंदर कामगार सेनेने लावलेल्या फलकाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य झाल्या असल्या तरी त्या कामांसाठी पालिकेतीलच अधिकारी - कर्मचारी अडवणुक करुन पैसे मागत असल्याचे उघड करत अशा पैसे मागणाऱ्यांची तक्रार आयुक्त व कामगार संघटनेकडे करा असे आवाहन फलकावर केले आहे. यातुन कर्मचारायांना त्यांच्या प्रशासकिय कामांसाठी पालिकेत पैसे घेतले जात असल्याच्या प्रकारांना उजाळा मिळाला आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या शाळेतील फरीदा कुरेशी या शिक्षिके कडुन प्रलंबित वेतन वाढ आदी साठी लाच घेताना उपशिक्षक असलेला अनिल आगळे हा रंगेहाथ ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागला होता. शिवाय पालिकेतील कंत्राटी भरती, कायम भरती, वेतनवाढ, पदोन्नती आदींसह निवृत्त वेतन, वारसा हक्क आदी कामां करीता वरिष्ठ अधिकाऱ्यांची वा संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांची होणारी अर्थपूर्ण अडवणुक नेहमीचीच आहे. काही प्रकरणात तर कर्मचारी व त्यांच्या संघटनेने तक्रारी केल्या आहेत.
महापालिका कर्मचाऱ्यांची मुख्य संघटना असलेल्या मीरा भाईंदर कामगार सेनेने मुख्यालयातच लावलेल्या फलकामुळे पालिकेतील काही अधिकारी - कर्मचारीच पालिकेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना पैशांच्या मागणी साठी कसे नाडतात हेच त्यावरुन शिक्कामोर्तब होत आहे. शिवसेना प्रणित या कामगार सेनेने लावलेल्या फलकात, काही अधिकारी व कर्मचारी हे १२ व २४ वर्ष सेवा केलेल्यांना वेतनवाढ, पेन्शन, वारस प्रकरण, घर वाटप आदी कामांसाठी पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी संघटने कडे आल्या आहेत असे स्पष्ट नमुद केले आहे.
सदर कामां करीता कोणत्याही अधिकारी - कर्मचाऱ्याकडे पैसे न देता त्यांची थेट महापालिका आयुक्त व कामगार संघटनेकडे लेखी तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. लेखी तक्रारीवर संघटने कडुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील सरचिटणीस श्याम म्हाप्रळकर यांनी फलका द्वारे दिला आहे.
या फलका मुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर पालिकेत कर्मचाऱ्यांचाच विविध रास्त मागण्या व कामांसाठी काही अधिकारी - कर्मचारी कडुनच पैशांची मागणी केली जात असल्याचे जाहिरपणे लिहण्यात आल्याने एरव्ही दबक्या आवाजात होणाऱ्या या खाऊ विकृतीला चव्हाट्यावर आणण्याचे काम कामगार सेनेने केले आहे. शिवसेना प्रणित कामगार संघटनेने नुकतीच आयुक्तांसोबत बैठक घेऊन कर्मचारायांच्या विविध मागण्या मान्य करुन घेतल्याचे जाहिर केले होते. पण मागण्या मान्य झाल्या तरी कामांची पुर्तता करण्यासाठी पैशांची मागणी केली जात असेल तर मात्र भ्रष्टाचारायांना सोडणार नाही असे म्हाप्रळकर यांनी सांगीतले.