शिवसेना-भाजपविरोधात कामगार संघटना एकवटल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:25 AM2019-04-18T01:25:14+5:302019-04-18T01:26:46+5:30
सध्याचे केंद्रातील भाजप सरकार कामगारविरोधी असल्याचा आरोप करून येथील विविध कामगार संघटना एकत्र आल्या.
ठाणे : सध्याचे केंद्रातील भाजप सरकार कामगारविरोधी असल्याचा आरोप करून येथील विविध कामगार संघटना एकत्र आल्या. निवडणुकीच्या या कालावधीत त्यांनी शिवसेना-भाजपाविरोधात विविध उपक्रम हाती घेऊन मतदारजागृती सुरू केली. केंद्रातील सध्याच्या सरकारविरोधात ‘कामगारांचा ठाम निर्धार, आता भाजपाला करा सत्तेतून हद्दपार’ आदी घोषणांची पत्रकेही त्यांनी वाटपास प्रारंभ केला आहे.
सत्ताधारी पक्षांचे उमेदवार चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार करून मतदारांना आपलेसे करत आहेत. मात्र, याच कालावधीत ‘कामगार संघटना संयुक्त कृती समिती’ गठीत करून त्याखाली कामगार संघटना सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांसह प्रचाराविरोधात एकवटल्या आहेत. यामध्ये इंटक, हिंद मजदूर सभा, सिटू, एनटीयूआय, टीयूसीआय, एआयसीसीटीयू, मानवी हक्क अभियान, म.रा. कामगार संघटना कृती समिती, भारतीय महिला फेडरेशन, श्रमिक जनता संघटन, ओबीसी संघर्ष समन्वय समिती, ठाणे मेडिकल असोसिएशन, घोडबंदर रोड हाउसिंग सोसायटी वेल्फेअर असो. आदी संघटनांचा समावेश आहे.
केंद्रातील सरकार म्हणजे झूट-लूट-फूटचे सरकार, कामगारांचा ठाम निर्धार भाजपाला करा सत्तेतून हद्दपार, आदींद्वारे सत्तेतील सरकार हद्दपार करण्याचे मुद्दे पटवून दिले जात आहे. पत्रकेवाटपासह कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सरकारविरोधात मतदान करण्याचे सांगितले जात आहे. गडकरी रंगायतनमध्ये नुकतेच कार्यकर्ता मेळावाही पार पडला. कामगार मेळावे, मीटिंग घेऊन आणि वस्त्यावस्त्यांमध्ये पदयात्रा काढून मतदारांमध्ये जागृती केली जात आहे.