श्रमजीवी संघटनेचा सफाई व उद्यान विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगारासाठी पुन्हा आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 08:01 PM2020-09-23T20:01:17+5:302020-09-23T20:01:21+5:30
काही पदाधिकारी आणि अधिकारी पगार होऊ देत नसल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने आज बुधवारी पुन्हा आंदोलन केले.
मीरारोड - मीरा-भाईंदर महापालिकेतील कंत्राटी सफाई व उद्यान विभागातील कामगारांचा पगार देण्यासाठी आयुक्तांनी धनादेश तयार करून ठेवलेला असतानादेखील काही पदाधिकारी आणि अधिकारी पगार होऊ देत नसल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने आज बुधवारी पुन्हा आंदोलन केले.
महापालिकेतील दैनंदिन साफसफाईसाठी ठेकेदार नेमलेला असून सदर ठेकेदाराच्या माध्यमातून शार सफाईचे काम कंत्राटी सफाई कामगार करत आहेत. तर पालिकेच्या उद्यान विभागात देखील ठेक्याने मजूर काम करत आहेत. सदर कामगारांना सप्टेंबर संपायला आला तरी ऑगस्ट महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांनी पालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाबाहेर शुक्रवारी सायंकाळी धरणे आंदोलन केले होते.
श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्याशी पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड आणि उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी चर्चा केली. महापालिकेकडे असणारा निधी अपुरा असून, राज्य सरकारकडून अनुदान येत नाही. त्यामुळे कामगारांचा पगार द्यायला उशीर होतो. बुधवारपर्यंत कामगारांचे पगार होतील. यापुढे आधी पगार सफाई कामगारांचा होईल त्यानंतर इतर विभागाचे पगार करू, असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले होते.
आयुक्तांच्या आदेशानुसार ठेकेदाराचा धनादेश तयार करून ठेवला होता. परंतु पालिकेतील काही पदाधिकारी हे अधिकाऱ्यांना हा पगार करू देत नव्हते. याची माहिती पंडित यांनी आयुक्तांना कळविल्यावर आयुक्तांनी तात्काळ कारवाई करीत उद्याच पगार करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला. परंतु आज बुधवारी पगार झाला नाही म्हणून दुपारी ३ वाजता आपले काम पूर्ण केल्यावर कंत्राटी कामगारांनी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे एकत्र जमून पगार रोखणाऱ्या त्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा निषेध केला.
पगार रखडल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक अडचण होत असून घर खर्च चालवणे अवघड झाले आहे. अनेकांना घरभाडे भरणे शक्य होत नाही. प्रवासासाठी पैसे नाहीत अशी परिस्थिती कामगारांची झाल्याने पालिकेने कामगारांची काळजी घेतली पाहिजे, असे श्रमजीवीचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल म्हणाले. ठाणे जिल्हाध्यक्ष दिलीप गोतारणे यांच्या सहकार्याने प्रभारी अध्यक्ष मंगेश मोरे, चेतन पाटील, रत्नाकर पाटील, हनुमंता जाधव, दिगंबर मेहर, संदीप पाटील, दीपक पाटील, इरफान शेख रमेश गोरेकर आणि इतर संघटक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले, असे प्रवक्ते मंगेश मोरे यांनी सांगितले.