उल्हासनगर महापालिकेची लॅबोरेटरी बंद, लाखोंच्या मशीन धूळखात, आयुक्त म्हणाले...
By सदानंद नाईक | Published: January 31, 2024 07:10 PM2024-01-31T19:10:15+5:302024-01-31T19:10:34+5:30
महापालिका लॅबोरेटरी पुन्हा सुरू करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव गेला.
उल्हासनगर: महापालिकेने कोविड महामारी वेळी सुरू केलेली अत्याधुनिक लॅबोरेटरी गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने, लॅबोरेटरी मधील लाखो किंमतीच्या मशीन धूळ खात पडल्या आहेत. मात्र नागरिकांच्या सेवेसाठी लॅबोरेटरी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेकडे कोविड काळात स्वतःचे रुग्णालय नसतांना, शासनाच्या निधीतून तत्कालीन आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी कॅम्प नं-१ येथील कोणार्क रेसिडेन्सी जवळ अत्याधुनिक लॅबोरेटरी उभारली. कोविडची टेस्ट काही तासात मिळत असल्याने, रुग्णांवर उपचार करण्यास सोयीचे झाले होते. त्यामुळे इतर शहारा पेक्षा कोविड मृत्यूचे प्रमाण शहरात कमी राहिले आहे. कोविड रुग्ण शून्यावर आल्यावर इतर तपासण्या याठिकाणी केल्या जात होत्या. मात्र लॅबोरेटरी मध्ये डॉक्टरसह तपासणी करणारा संपूर्ण कर्मचारी वर्ग कंत्राटी असल्याने, त्यांच्या पगारावर लाखो रुपये खर्च करणे महापालिकेला परवडणारे नोव्हते. महापालिकेने ठेकेदाराला मुदत वाढ न दिल्याने, लॅबोरेटरी बंद पडली. त्यानंतर महापालिका आरोग्य केंद्रातील रुग्ण व नागरिकांना अल्प दरात इतर तपासण्या उपलब्ध व्हाव्या. यासाठी लॅबोरेटरी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव तत्कालीन आरोग्य अधिकारी यांनी आयुक्तांना दिला होता.
महापालिका लॅबोरेटरी पुन्हा सुरू करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव गेला. मात्र काहीएक हालचाली न झाल्याने, गेल्या दोन वर्षांपासून लॅबोरेटरी बंद आहे. त्यामुळे लॅबोरेटरी मधील लाखो रुपयांच्या मशीन व इतर साहित्य धूळखात पडल्या आहेत. लाखमोलाचे साहित्य व मशीन चोरीला जाऊ नये म्हणून २४ तास सुरक्षारक्षक तैनात ठेवले आहे. महापालिका अंतर्गत एकून ९ आरोग्य केंद्र व ४ आपला दवाखाने सुरू आहेत. यातील रुग्णांची रक्तासह अन्य चाचण्या खाजगी संस्थेकडून केल्या जात असून गर्भवती महिलांच्या एका सोनोग्राफीसाठी महापालिका खाजगी संस्थेला ४ हजार रुपये मोजत आहे. अशी माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ धर्मा शर्मा यांनी दिली. तसेच महापालिका लॅबोरेटरी पुन्हा सुरू करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविल्याचे म्हणाले.
महापालिका लॅबोरेटरी सुरू करण्याचे आदेश
रिजेन्सी येथील महापालिका रुग्णालय उदघाटनाच्या प्रतिक्षेत असून बंद पडलेली महापालिका लॅबोरेटरी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लॅबोरेटरीचा लाभ सामान्य नागरिकांसह महापालिका आरोग्य केंद्र व आपला दवाखान्यातील रुग्णांना होणार असल्याचे आयुक्त अजीज शेख म्हणाले. लॅबोरेटरी मधील बहुतांश मशीन उपयोगात येणार आहे.