दरमहिन्याला ३०० रक्तदात्यांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:46 AM2018-05-12T01:46:57+5:302018-05-12T01:46:57+5:30

रक्तपेढीत वर्षभरात १५ हजार दात्यांकडून रक्तदान केले जाते. त्यात स्वत:हून रक्तदान करणारे आणि शिबिरांमध्ये रक्तदान करणारे आहेत. पण, हा आकडा पुरेसा नाही.

Lack of 300 donors per month | दरमहिन्याला ३०० रक्तदात्यांची कमतरता

दरमहिन्याला ३०० रक्तदात्यांची कमतरता

Next

डोंबिवली : रक्तपेढीत वर्षभरात १५ हजार दात्यांकडून रक्तदान केले जाते. त्यात स्वत:हून रक्तदान करणारे आणि शिबिरांमध्ये रक्तदान करणारे आहेत. पण, हा आकडा पुरेसा नाही. महिन्याला २०० ते ३०० रक्तदात्यांची कमतरता भासत आहे. काही ठरावीक दातेच रक्तदान करतात. मुबलक रक्तपुरवठा होण्यासाठी रक्तदानाविषयी जागृतीची गरज आहे, असे मत प्लाझ्मा रिसर्च ट्रस्ट रक्तपेढीचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र भागवत यांनी व्यक्त केले.
रक्तदान केल्यानंतर त्याचे विघटन कसे केले जाते, रक्ताचा तुटवडा आणि रक्तपेढींची माहिती जाणून घेण्यासाठी डोंबिवली पत्रकार संघातर्फे प्लाझ्मा रक्तपेढीत शुक्रवारी वार्तालापाचा कार्यक्रम झाला. यावेळी भागवत बोलत होते. संस्थेच्या मुख्य पॅथॉलॉजिस्ट डॉ. एच.ए. शाह, डॉ. अपर्णा बागुल, मुख्य व्यवस्थापक अर्पिता दिघे उपस्थित होते.
भागवत म्हणाले, ‘प्लाझ्मा रक्तपेढी २५ वर्षांपासून १२५ थॅलेसेमियाच्या रुग्णांना मोफत रक्त देत आहे. सलाइनद्वारे लाल रक्तपेशी दिल्या जातात. ही सेवा थॅलेसेमिया रुग्णांना मोफत दिली जाते. ‘सिंगल डोनर प्लेटलेट’ सुविधा या रक्तपेढीत आहे. त्यासाठी विशेष मशीन बसवली आहे. आयएच-१००० या अमेरिकन रोबॉटिक हॅण्ड्स मशीन पद्धतीने ओ. बी. ए. आणि एबी रक्तगटांव्यतिरिक्त केल, डफी, कीड अशा १० प्रकारच्या नव्या रक्तगटांचे वेगळेपण या रक्तपेढीत केले जाते. येथील स्वयंचलित मशिनरीमुळे रक्तातील एचआयव्ही व इतर धोका कमी होतो.’
‘रक्तदानानंतर दात्याला व्हीओएलकार्ड दिले जाते. प्लाझ्मा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा होत नाही. पण, उन्हाळ्यात व डेंग्यू आदी साथींच्या आजाराच्या काळात रक्तदान कमी झाल्यास रक्ततुटवडा जाणवतो. यामुळे मुबलक रक्तपुरवठा व्हावा, यासाठी रक्तदानाच्या जागृतीची गरज आहे. ट्रस्टने त्यासाठी मेडिकल सोशल वर्करची नेमणूक केली आहे. घरी जाऊन रक्तदात्यांकडून रक्त घेण्याची सुविधाही ट्रस्टतर्फे पुरवली जाते. तसेच डोंबिवली ते कर्जतपर्यंत रक्तपुरवठा केला जात आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या काळात ट्रस्टने मोफत रक्तपुरवठा केला होता. सरकारी रुग्णालयांना वेळोवेळी रक्तपुरवले जाते,’ असे भागवत म्हणाले.

दात्याने रक्तदान केले तरी २५ ते ३० टक्के दात्यांचे रक्त अनेक कारणांनी नाकारले जाते. त्यांच्या रक्तात हिमोग्लोबीन कमी असते, उच्च रक्तदाब अशा अनेक कारणांमुळे त्यांचे रक्त अयोग्य ठरते.
निगेटिव्ह रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे. रुग्णाला रक्ताची आवश्यकता असल्यास आम्ही दात्यांना फोन करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी ‘ए’ आणि ‘बी’ पॉझिटिव्ह रक्ताचीही कमतरता भासते. कधीकधी ‘ए’ या एकाच गटाचे रक्तदाते दिवसभरात येतात. त्यामुळे इतर गु्रपची कमतरता निर्माण होते, असे भागवत म्हणाले.प्लेटलेट या पाच दिवसांच्या आतच रुग्णांसाठी वापरल्या जाऊ शकतात. या काळात रुग्णांना गरज न भासल्यास त्या फेकून द्याव्या लागतात. १०० प्लेटलेटमधून ७० प्लेटलेट फेकून दिल्या जातात. तर, केवळ ३० प्लेटलेट उपयोगात येतात. पण आम्हाला अचानक गरज उद्भवू शकते. त्यामुळे त्या रक्तपेढीत उपलब्ध करून द्याव्या लागतात.

Web Title: Lack of 300 donors per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.