गौरकामथ पशुवैद्यकीय दवाखान्यात मूलभूत सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:53 AM2017-10-07T01:53:44+5:302017-10-07T01:53:56+5:30
कर्जतपासून जवळच असलेल्या गौरकामथ येथे २००९-१० मध्ये सुमारे १० लाख रुपये खर्च करून रायगड जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने पशुवैद्यकीय दवाखाना उभारला.
नेरळ : कर्जतपासून जवळच असलेल्या गौरकामथ येथे २००९-१० मध्ये सुमारे १० लाख रुपये खर्च करून रायगड जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने पशुवैद्यकीय दवाखाना उभारला. मात्र खेदाची बाब म्हणजे दवाखान्याला अधिकृत वीजपुरवठाच केलेला नाही. परिणामी फ्रीज बंद असल्याने लसी थंड वातावरणात ठेवणे शक्य होत नाही. तसेच पाणीपुरवठाही नसल्याने येथील पशुवैद्यकीय अधिकाºयांना काम करणे गैरसोईचे होत आहे.
कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. या शेतीला पूरक म्हणून गाई, म्हशी, बकºया, पाळून दुग्धव्यवसाय केला जातो. तसेच कुक्कुटपालनाचाही व्यवसाय करतात. या जनावरांना सुध्दा विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. अशा आजारी जनावरांवर तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार होणे गरजेचे आहे. या जनावरांना होणारे साथीचे तसेच अन्य आजारांवर उपचार म्हणून लसीकरण करण्यात येते.
शासनातर्फे अत्यंत माफक दरात लस उपलब्ध होते. लस थंड वातावरणात ठेवण्याची आवश्यकता असल्याने दवाखान्यात फ्रीज आहे, परंतु कित्येक महिन्यांपासून वीजपुरवठा नसल्याने हा फ्रीज बंद आहे. त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून या लसी संबंधित कर्मचारी आपल्या घरी ठेवतात, असे कर्मचाºयांनी सांगितले.
येथे पशुधन विकास अधिकारी पदावर डॉ. एस. डी. भोसले कार्यरत आहेत. जनावरांना होणाºया आजारांमध्ये पोटफुगे, जुलाब, गोचिडाचा प्रादुर्भाव, घटसर्प, लाळ खुटकत, कोंबड्यांची मानमोडी, लासोटा, देवी आदी रोग होतात, अशी माहिती दिली.
डॉ. भोसले यांच्याकडे गौरकामथव्यतिरिक्त खालापूर तालुक्यातील जांभूळपाडा येथीलही जबाबदारी त्यांच्यावर असल्याने गौरकामथ पशुवैद्यकीय दवाखान्यात ते जास्त उपस्थित राहू शकत नाहीत. यामुळे शेतकºयांचीही गैरसोय होत आहे.
याचप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सभोवताली संरक्षक भिंत नसल्याने आणि वीजपुरवठा नसल्याने रात्रीच्या वेळेस त्या दवाखान्यात तळीरामांची मैफल जमते. येथे रात्रीच्या वेळेस कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने या तळीरामांचे आयतेच फावते. जनावरांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात स्टॅण्ड उभे करण्यात आले आहे, परंतु त्यावरही शेड नसल्याने पावसाळ्यात उपचार करण्यास समस्या जाणवते.