रस्ते, पाणी, साफसफाई आदी मूलभूत गरजेची वानवा; उल्हासनगरचा ७२ वा वर्धापन दिवस, मात्र समस्या जैसे थे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 04:54 PM2021-08-07T16:54:16+5:302021-08-07T16:56:07+5:30
८ ऑगस्ट रोजी शहराचा ७२ व्या वर्धापन दिन साजरा होत आहे. अनेक मूलभूत समस्यांमुळे नागरिक झालेत त्रस्त.
सदानंद नाईक
उल्हासनगर : ८ ऑगस्ट रोजी शहराचा ७२ व्या वर्धापन दिन साजरा होत असतांना दुसरीकडे पाणी टंचाई, साफसफाई, रस्ते, आरोग्य आदी मूलभूत समस्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनाधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न उभा ठाकला असून महापालिकेच्या बहुतांश विभागात सावळागोंधळ उडून आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. फाळणीवेळी पाकिस्तान मधील सिंध प्रांतातून सिंधी समाजसह अन्य समाजाच्या नागरिकांनी भारतात येणे पसंत केले. विस्थापित झालेल्या पैकी ९५ हजारा पेक्षा जास्त नागरिकांना कल्याण शहारा जवळींल लष्करी छावणीतील बेरेक, खुली जागा आदी ठिकाणावर वसविण्यात आले. भारताचे पहिले गव्हर्नर सी राजगोपालचारी यांनी शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी वरून विस्थापित वस्तीला उल्हासनगर नाव दिलं. मात्र अनेक सिंधी बांधवानी उल्हासनगर ऐवजी सिंधूनगर नाव देण्याची मागणी त्यावेळी केली होती. मात्र फाळणीच्या कटू आठवणी नको म्हणून उल्हासनगर नाव देण्यात आले.
अतिशय काटक, उधोगप्रिय असलेल्या सिंधी बांधवानी शहराचे नाव राज्य, देश नव्हेतर जगावर छाप टाकली. सिंधी समाजाच्या नागरिकांनी बांधकाम व्यावसायिक, सिनेमा क्षेत्र, उधोग, हॉटेल, कपडे, फर्निचर आदी अनेक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमठविला. मात्र शहर विकास नावाला होऊन हजारो नागरिकांचा जीव धोकादायक व अनाधिकृत इमारातीमुळे टांगणीला लागला. देशात सिमेंट रस्त्याची सुरुवात शहरातून झाली असून शहरातील सिमेंट रस्ते डोळ्यासमोर ठेवून, इतर शहरे व देश सिमेंट रस्ते बांधत आहेत. तर शहरात खराब झालेल्या सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ते बांधले जात आहे. एकूणच रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी पाणी टंचाईचीही समस्या उभी ठाकली आहे. तर महापालिकेच्या बहुतांश विभागात सावळा गोंधळ उडाला असून महापालिका कारभारावर टीकेची झोड उठली आहे. एकूणच ७२ वर्षानंतरही शहर बकाल व समस्यांचा पाऊस पडत आहे.
महापालिका कारभारात हवी पारदर्शकता
अवघे साडे १३ कि.मी. च्या क्षेत्रफळाच्या शहरात ९ लाखा पेक्षा जास्त लोकसंख्या दाटीवाटीने राहत आहे. देशातील सर्वाधिक घनता शहराची असून शहराची हद्द वाढविण्याची मागणी वारंवार शासनाकडे होत आहे. तसेच महापालिकेचा पारदर्शक नसल्याने, शहरात समस्यांचा पाऊस पडला. यावेळी शहर विकासाचे व विभागातील गोंधळाचे खापर पालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्यावर फोडण्यात येत आहे.