कल्याण-डोंबिवलीत खाजगी रुग्णालयांत बेडची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:24+5:302021-04-02T04:42:24+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खाजगी कोविड रुग्णालयांवर आरोग्यसेवा पुरविताना ताण येत आहे. या ...

Lack of beds in private hospitals in Kalyan-Dombivali | कल्याण-डोंबिवलीत खाजगी रुग्णालयांत बेडची कमतरता

कल्याण-डोंबिवलीत खाजगी रुग्णालयांत बेडची कमतरता

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खाजगी कोविड रुग्णालयांवर आरोग्यसेवा पुरविताना ताण येत आहे. या रुग्णालयांत बेडची कमतरता आहे. आयसीयू बेडसाठी १५ रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत असल्याची स्थिती आहे. ही स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी उपाययोजना करावी, अशी सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी मनपा प्रशासनास केली आहे.

मनपा हद्दीत दिवसाला ८०० ते ९०० च्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत एकूण ७९ हजार १४२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ६९ हजार २८५ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. कल्याणच्या मीरा रुग्णालयात एकूण ४५ बेडपैकी पाच आयसीयू आणि ४० ऑक्सिजन, श्रीदेवी रुग्णालयात एकूण ५० बेडपैकी १५ आयसीयू आणि ३५ ऑक्सिजन, आयुष रुग्णालयात एकूण ६५ बेडपैकी २० आयसीयू तर उर्वरित ऑक्सिजनचे बेड आहेत. कल्याणनजीक कोन गावात वेद रुग्णालयात एकूण ६० बेडपैकी २० आयसीयू आणि ४० ऑक्सिजनचे बेड आहेत. डोंबिवलीतील आर. आर. रुग्णालयात एकूण ८५ बेडपैकी आयसीयू २०, ऑक्सिजनचे २० आणि जनरल वॉर्डमध्ये ४० बेड आहेत. मनपा हद्दीत कोरोना रुग्णांवर उपचार करणारी ३६ खाजगी रुग्णालये आहेत. मात्र, सध्या ती रुग्णांनी भरलेली आहेत. आयसीयू बेडसाठी किमान १५ रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यावर वेळीच नियंत्रण मिळविले पाहिजे, याकडे डॉ. पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

सहा हजार ०९७ मुले बाधित

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण कमी होते. तेव्हा ५ ते २० वर्षे वयोगटांतील ७३३ जण बाधित होते. मात्र, आता हीच संख्या सहा हजार ०९७ इतकी आहे. बाधित असलेली लहान मुले सगळ्यांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

मुले, गरोदर महिलांसाठी रुग्णालय सुरू करा : पाटील

मनपा हद्दीत कोरोनाची लागण झालेल्या गरोदर महिलांसाठी एकच खाजगी रुग्णालय आहे. तेथे बेड न मिळाल्यास त्या गरोदर महिलेस मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे कोरोनाने बाधित असलेली मुले व गरोदर महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याची मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे.

---------------------

Web Title: Lack of beds in private hospitals in Kalyan-Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.