खर्चाबाबत तक्रारींचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 02:28 AM2019-04-07T02:28:44+5:302019-04-07T02:29:00+5:30
जिल्ह्यात तीन निवडणूक खर्च निरीक्षक : पाच दिवसांत एकही तक्रार नाही
- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन खर्च निरीक्षक जिल्ह्यात नेमले आहेत. त्यांची कार्यालयेही ठिकठिकाणी सुरू झाली आहेत. त्या ठिकाणी किंवा भ्रमणध्वनीवर नागरिकांना अनावश्यक खर्चाच्या तक्रारी करण्याची मुभा आहे. मात्र, पाच दिवसांत या तिन्ही निरीक्षकांकडे नागरिकांकडून एकही तक्रार आली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पथकांच्या निरीक्षकांची नियुक्ती जिल्ह्यात करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक नियुक्त केले आहेत. या प्रत्येकावर दोन मतदारसंघांची जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच स्वीप निरीक्षक हे लोकसभा मतदारसंघनिहाय तैनात राहणार आहेत. याप्रमाणेच जिल्ह्यात सद्य:स्थितीला तैनात असलेल्या पथकांकडून अवैध दारू, आचारसंहितेचा भंग करण्याऱ्या घटनांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. याशिवाय, बँकेतून काढण्यात येणाऱ्या मोठ्या रकमांसह अन्यत्र नेण्यात येणाºया रकमांना खर्च निरीक्षकांच्या नजरा टिपत आहेत. यासाठी अद्याप नागरिकांकडून खास तक्रारी आलेल्या नाहीत. पण, ठिकठिकाणी आलेल्या संशयावरून जिल्ह्यात या खर्च निरीक्षकांनी मोठ्या रकमेची रोकड जप्त केल्याचे दिसून आले.
भिवंडीमधून पहिल्या दिवशी साडेचार लाख रुपये आणि शुक्रवारी दोन लाख १४ हजार आणि १० लाखांची रक्कम वाहनातून पकडण्यात आली. या रोकडजप्तीच्या तीन घटना भिवंडीमध्ये घडल्या आहेत. तर, ठाणे मतदारसंघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघामधील उरणफाटा ब्रिज येथे वाहनातून घेऊन जात असलेली १० लाखांची रक्कम पकडली आहे.
मतदारसंघातील अवैध घटनांवर लक्ष
या खर्च निरीक्षकांच्या कार्यालयातदेखील नागरिकांकडून काहीही तक्रारी आलेल्या नाहीत. पण, येथील पथकांनी सध्या रस्त्यांवरील अवैध घटनांवर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि उमेदवारी माघारी घेण्याच्या कालावधीत संबंधित ठिकाणी खर्च निरीक्षक संबंधित कार्यालयात थांबणार असल्याचे खर्च निरीक्षक विवेकानंद यांनी सांगितले. यामुळे तिन्हीही खर्च निरीक्षकांच्या कार्यालयांमधील दूरध्वनी सध्या उचलण्यात येत नसल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात अवैध रकमेचा पुरवठा कोठूनही होऊ नये, यासाठी खर्च निरीक्षकांच्या नजरा चौफेर लक्ष ठेवून आहेत. बँकांमधून होणाºया आर्थिक व्यवहारांवरदेखील नजर ठेवून आहे. संशयास्पद व्यवहार आढळून आल्यास संबंधित बँकांनी तत्काळ निवडणूक यंत्रणेस कळवण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.