‘त्या’ महाकाय वटवृक्षाची भासली उणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:20+5:302021-06-25T04:28:20+5:30
कल्याण : वटपौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी वडाच्या झाडांचे महिलांकडून पूजन करण्यात आले. गेल्या वर्षी कल्याण पश्चिमेतील जुना वटवृक्ष काेसळल्याने गुरुवारी ...
कल्याण : वटपौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी वडाच्या झाडांचे महिलांकडून पूजन करण्यात आले. गेल्या वर्षी कल्याण पश्चिमेतील जुना वटवृक्ष काेसळल्याने गुरुवारी त्याची प्रकर्षाने उणीव भासली. त्यातच खबरदारी म्हणून ठिकठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स आणि जमावबंदीचे फलक लागले हाेते. त्यामुळे सावित्रींची गैरसाेय झाल्याने तेथे वर्षानुवर्षे येणाऱ्या सुवासिनींनी अखेर पारनाक्यावरील वडाच्या झाडाची पूजा करून परंपरा जोपासली.
पश्चिमेतील टिळक चौक परिसरातील दत्तआळीतील जुना वटवृक्ष गेल्या वर्षी २४ ऑगस्टला संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उन्मळून पडला. १८० वर्षे जुना वटवृक्ष कोसळल्याने अनेक पिढ्यांचा साक्षीदार इतिहासजमा झाला. यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी या महाकाय वटवृक्षाची उणीव प्रकर्षाने जाणवली. दरवर्षी वटपौर्णिमेला मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी येऊन पूजाअर्चा करीत असत. या निमित्ताने गजबजणारा हा परिसर गुरुवारी सुनासुना होता. येथील श्री गुरुदेव दत्तसंस्थान यांच्या वतीने काेराेनाच्या पार्श्वभूमीवर वटपौर्णिमेनिमित्त पूजा होणार नसल्याचा फलक लावला होता. सध्याचे वडाचे रोप हे नव्याने लावले असून, ते कोवळे आहे. त्यामुळे त्याची पूजा करणे शक्य नाही. सर्व सुवासिनींनी याची दखल घेऊन सहकार्य करावे, असेही संस्थानातर्फे फलकावर नमूद केले होते. त्यामुळे सकाळी वडाच्या पूजेसाठी आलेल्या सुवासिनींना दत्तमंदिरात दर्शन घेऊन अन्य ठिकाणी जावे लागले. पोखरण तलावाजवळील जुने वडाचे झाडही धोकादायक झाल्याने तेथेही पूजा करण्यास बंदी होती. अखेर पारनाका परिसरात असलेल्या वडाची पूजा करून सुवासिनींनी परंपरा जपली.
------------------------------------------------------
आनंद मोरे फोटो