ठाण्यातील सराफाला घातला लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 06:19 AM2018-04-22T06:19:17+5:302018-04-22T06:19:17+5:30
महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शोरूममधील संतोष थेराडे व तुषार मोरे हे दोन कर्मचारी एक लाखाचे सुटे घेऊन तांबे यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले.
ठाणे : शहरातील प्रसिद्ध सराफाला एका महिलेने फोन करून डॉक्टर बोलत असल्याची बतावणी केली. सोन्याच्या पाटल्या खरेदी करायच्या आहेत. त्यासाठी माप घ्यायला माणसांना पाठवा, असे सांगितले. तसेच त्यांच्याबरोबर सुटे पैसे हवे असल्याचे सांगून सोबत एक लाख रूपये सुटे पाठवून द्या, असेही सांगितले. त्यानुसार ती रक्कम घेऊन एक जण पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे रेल्वे स्टेशन परिसरालगत नौपाड्यात वामन हरी पेठे सन्स हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे शोरूम आहे. याच शोरूमच्या पहिल्या मजल्यावर तांबे हॉस्पिटल आहे. शुक्रवारी दुपारी वामन हरी पेठे सन्स या शोरूममधील लॅण्डलाइन क्र मांकावर एका अनोळखी महिलेने फोन केला. तिने मी डॉक्टर स्वाती तांबे बोलत असल्याचे सांगितले. मला सोन्याच्या पाटल्या खरेदी करायच्या आहेत, त्यासाठी माप घ्यायला माणसे पाठवा, अशी बतावणी केली. याचवेळी फोनवरून बोलणाऱ्या त्या अनोळखी महिलेने एक लाखाचे सुटे पैसेही दवाखान्यात हवे आहेत, ते देखील पाठवा, असे सांगितले.
महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शोरूममधील संतोष थेराडे व तुषार मोरे हे दोन कर्मचारी एक लाखाचे सुटे घेऊन तांबे यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. त्याचवेळी तेथे असलेल्या एका तरु णाने दोघांना मी तांबे यांचा मुलगा आहे. पैसे माझ्याकडे द्या, असे त्याने सांगितले. त्यानंतर तो पैसे घेऊन पसार झाला. काही वेळानंतर फोन करणारी महिला ही स्वाती तांबे नव्हती आणि पैसे घेणारादेखील त्यांचा मुलगा नसल्याचे उघड झाले. त्यामुळे शोरूममधील कर्मचारी श्रीकांत अधिकारीदेसाई यांनी नौपाडा पोलिसात धाव घेऊन याप्रकरणी तक्र ार दिली.