लाखाचे नुकसान होऊनही केवळ ४९६ रुपयांची मदत

By admin | Published: May 28, 2017 03:13 AM2017-05-28T03:13:47+5:302017-05-28T03:13:47+5:30

एक वर्षापूर्वी प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे पूनम वालावलकर यांच्या घराचे तब्बल एक लाख रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, घराच्या नुकसानभरपाईपोटी

Lack of losses cost only Rs. 496 | लाखाचे नुकसान होऊनही केवळ ४९६ रुपयांची मदत

लाखाचे नुकसान होऊनही केवळ ४९६ रुपयांची मदत

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : एक वर्षापूर्वी प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे पूनम वालावलकर यांच्या घराचे तब्बल एक लाख रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, घराच्या नुकसानभरपाईपोटी त्यांना अलीकडेच नाममात्र ४९६ रुपयांचा धनादेश सरकारकडून प्राप्त झाला. नैसर्गिक आपत्तीचा मार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची आतापर्यंत अशी क्रूर थट्टा करणाऱ्या सरकारने आता स्फोटासारख्या घटनेत सापडलेल्यांचीही रेवडी उडवण्यास सुरुवात केली आहे.
या स्फोटात ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांचे नुकसानभरपाईचे धनादेश मंजूर होणे बाकी आहे. मात्र, ज्या मोजक्या लोकांना मदत दिली, ती अशी तुटपुंजी असल्याने आपद्ग्रस्त सरकारच्या नावाने बोटे मोडत आहेत. उर्वरित नुकसानग्रस्तांना अशाच प्रकारे मदत मिळणार असेल, तर सरकारची मदत हवी कशाला, असा संतप्त सवाल मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्यांनी केला आहे.
प्रोबेस कंपनीच्या जवळच ‘मंगलमूर्ती’ इमारतीत वालावलकर यांचे घर आहे. स्फोटात त्यांच्या घराचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले होते. भरपाईसाठी सरकारी यंत्रणांकडून त्यांच्या घराचा पंचनामा केला गेला. सरकारी यंत्रणांनी पंचनाम्यात नुकसानीचे गांभीर्य मान्य केल्याने आपल्याला समाधानकारक मदत मिळेल, अशी वालावलकर यांना अपेक्षा होती. मात्र, अलीकडेच त्यांच्या घरी ४९६ रुपयांचा धनादेश आला. धनादेश त्यांचे पती रवींद्र वालावलकर यांच्या नावाने मिळाला असून त्यांनी तोबँकेत जमा केलेला नाही. एवढी तुटपुंजी रक्कम घेऊन काय करणार, असा प्रश्न वालावलकर करीत आहेत. सरकारने आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असे वालावलकर कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सरकारी यंत्रणांनी २ हजार २६४ मालमत्ताधारकांच्या नुकसानभरपाईचा पंचनामा केला आहे. त्यांच्या नुकसानभरपाईपोटी सरकारकडून सात कोटी ४३ लाख रुपये मदत येणे अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवल्याचे कल्याणचे तहसीलदार व प्रांताधिकारी सांगत आहेत. अनेकांना अद्याप एक पैसा नुकसानभरपाई मिळालेली नाही. वर्ष उलटून गेले, तरी सरकारकडून मदतीचा हात मिळालेला नाही. यातून सरकारची अनास्थाच दिसून येते, असे लोकांचे मत आहे. गतिमान व पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या भाजपाच्या मुख्यमंत्र्यांकडून अशी दिरंगाई अक्षम्य असल्याचे नुकसानग्रस्तांचे म्हणणे आहे.
प्रोबेस स्फोटाला वर्ष उलटले तरी अनेक कामगार बेरोजगार असून, रहिवाशी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

आजूबाजूच्या अन्य तीन कारखान्यांचेही प्रोबेसच्या स्फोटात नुकसान झाले. त्यांनीही मदतीची मागणी केली होती. मात्र, त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. काही कारखाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिनाभर बंद ठेवले होते. त्यामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे.

शेजारील कंपनीला फटका
प्रोबेसशेजारील शेलकेम केमिकल्स कंपनीला स्फोटात मोठा फटका बसला असून, ती अद्याप बंद आहे.
या कंपनीचे तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, त्याचा पंचनामा होऊन छदामही मिळाला नाही, असे कंपनीचे सौमिल पारीख म्हणाले.

Web Title: Lack of losses cost only Rs. 496

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.