पैशाअभावी महिलेने रस्त्यात दिला बाळाला जन्म; डॉक्टरने वेळीच मदत केल्यामुळे वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:33 AM2020-05-25T01:33:06+5:302020-05-25T01:33:11+5:30
कोरोना चाचणीसाठी पैसे नाहीत
- कुमार बडदे
मुंब्रा : कोरोना चाचणी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास उशिर झाला आणि त्यामुळे तिने रस्त्यामध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना शुक्रवारी घडली. प्रसुतीनंतर बाळाची नाळ पोटातच राहिल्याने तिची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. मात्र जवळच्याच एका खाजगी डॉक्टरने मदत केल्यामुळे तिचा जीव वाचू शकला.
मुंब्य्रातील कौसा भागातील चर्णीपाडा परीसरात राहत असलेल्या राजुलन्निसा अहमद या गर्भवती महिलेवर येथील खाजगी रुग्णालयात औषधौपचार सुरु होते. तिची प्रसुतीची तारीख जवळ आल्याचे कळताच चार दिवसांपूर्वी तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिचा पती इसरारला तिची कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. सुतारकाम करणारा इसरार लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून बेरोजगार आहे. त्यामुळे चाचणीसाठी पैसे कुठून आणायचे, या विवंचनेत प्रसुतीची तारीख उलटून गेली.
अखेर शुक्रवारी रात्री तिला वेदना असह्य झाल्यानंतर त्याने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तिला नेण्याचा निर्णय घेतला. मात्र रात्री एक वाजता वाटेतच तिने मुंब्य्रातील रशिद कम्पाउंड परीसरातील रस्त्यावर बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर नाळ मात्र तिच्या पोटात राहिली होती. त्यामुळे तिला असह्य वेदना होत होत्या. घामाघूम होऊन तिचा चेहरा पांढरा पडला होता. हा भाग जर आणखी काही काळ तिच्या पोटात राहिला असता तर तिच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती.
काही जागरुक नागरिकांनी घटनास्थळापासून जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर इमरान खान यांना ही बाब सांगितली. तिची अवस्था बघून काही काळ काय करावे, हे त्यांनाही सुचत नव्हते. परंतु प्रसंगवधान राखून त्यांनी त्यांच्या रुग्णालयातील एका परिचारीकेच्या मदतीने तिच्या पोटातील नाळ व्यवस्थित बाहेर काढून तिचा जीव वाचवला.
सर्व स्तरांतून कौतुक
एकीकडे मुंब्य्रातील काही रुग्णालये कोरोनाच्या चाचणीच्या नावाखाली इतर आजार असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार देत आहेत. यामुळे उपचाराअभावी नुकताच एका १३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खान यांनी मात्र संबधित महिलेची कोरोना चाचणी झाली आहे की नाही, याचा विचार न करता डॉक्टर म्हणून जे कर्तव्य पार पाडले, त्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.