युतीत समन्वयाचा अभाव, गोळीबाराची घटना का घडली?; माजी आमदारानं स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 01:58 PM2024-02-05T13:58:50+5:302024-02-05T14:00:08+5:30
युतीत समन्वय नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांची ही अडचण आहे असं माजी आमदाराने सांगितले.
कल्याण - उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात घडलेल्या गोळीबाराचे कुणीही समर्थन करणार नाही. परंतु या घटनेमागची पार्श्वभूमी वरिष्ठांनी समजून घेतली पाहिजे असं सांगत भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या प्रकरणावर स्पष्टच मत व्यक्त केले.
माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की, जी घटना घडली ती नैराश्येतून घडली आहे. हे नैराश्य का आले हा चिंतनाचा विषय आहे. अनेकवेळा समन्वयाविषयी चर्चा झाली. युतीत समन्वय न दिसल्याने, न राहिल्याने अनेक अडचणी याठिकाणी बघायला मिळतात. त्याचाच एक भाग परवाच्या घटनेतून पाहायला मिळाला. ही घटना समर्थनीय नाही. कुणीही घटनेचे समर्थन करणार नाही. परंतु त्यामागची पार्श्वभूमी काय हे समजून घेणे गरजेचे आहे. भविष्यात भाजपा नेते, शिवसेना नेते या दोघांनी खालीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये जो समन्वयाचा अभाव आहे तो दूर करणे गरजेचा आहे. ही कार्यकर्त्यांची भावना आहे. कुणालाही ही घटना पटलेली नाही. एकमेकांविषयी मन कलुषित होणे ही गोष्ट गंभीर आहे. त्यामुळे नेत्यांनी तातडीने या गोष्टीत लक्ष घालून हे वाद मिटवले पाहिजे. भविष्यात येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आहेत त्यामुळे नेत्यांनी लक्ष घालावे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच युतीत समन्वय नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांची ही अडचण आहे. युतीत अडचण दिसतेय. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांकडे आम्ही समन्वय घडवून आणावा अशी मागणी केलीय. भाजपा आणि शिवसेना नेत्यांनी लवकरात लवकर हा वाद मिटवावा. ही भावना कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रत्येक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भावना आहे. नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि नेतृ्त्वाला आमच्यावर विश्वास आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात विकास व्हावा आणि यातून मार्ग काढला जाईल अशी आम्हाला खात्री आहे असंही माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले.
काय आहे वाद?
कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातच हा गोळीबार झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात आधीपासूनच वर्चस्वाचा वाद आहे. गणपत गायकवाड हे भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार असतानाही महेश गायकवाड यांनी उघडपणे शिवसेना बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड सातत्याने कल्याण लोकसभेत भाजपाचा उमेदवार असेल असं विधान करत होते. त्यामुळे शिवसेना-भाजपामधील हा वाद सातत्याने उफाळून येत होता. त्यानंतर हा वाद अखेर गोळीबारापर्यंत पोहचला आहे.