शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस मध्ये समन्वयाचा अभाव; उल्हासनगरात महाविकास आघाडीबाबत साशंकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 06:20 PM2022-02-13T18:20:57+5:302022-02-13T18:21:07+5:30
कलानी महल मध्ये इच्छुक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेणे सुरू केले. तर शिवसेनेने प्रभाग निहाय्य बैठका घेतल्या असून काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली. याप्रकारने महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असून महाआघाडी बाबत साशंकता निर्माण झाली.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना मित्र पक्षाची सत्ता असून भाजपला सत्ते पासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यामध्ये काही दिवसापूर्वी चांगला समन्वय असल्याचे चित्र होते. मात्र सत्तेसाठी राष्ट्रवादी मधील कलानी गट व शिवसेना यांच्यात संघर्ष उभा ठाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. माजी आमदार पप्पु कलानी जेल बाहेर आल्यानंतर शहरात झंझावती दौरा करून शहरातील वातावरण कलानीमय केले. याचा धसका स्थानिक शिवसेना नेत्यांनी घेतला आहे.
कलानी महल मध्ये इच्छुक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. तर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी विभागावर बैठका सुरू केल्या आहेत. तर काँग्रेस पक्षाने सर्वच प्रभागात उमेदवारीच्या चाचपाणी सुरू केल्या आहेत. याप्रकारने महाविकास आघाडीतील पक्षात समन्वय नसल्याचे उघड होऊन आघाडी बाबत साशंकता निर्माण झाली.
शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शिवसेनेच्या अंतर्गत बैठक घेतल्याची कबुली दिली असून वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी बाबत चर्चा होणार असल्याची कबुली दिली. तर राष्ट्रवादीचे युवानेते ओमी कलानी यांनी पक्षाचा निर्णय अंतिम असून त्यानुसार वेळेवर चर्चा होणार असल्याची प्रतिक्रिया दिली. तर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी पक्षाची ताकद वाढविण्याचे काम सुरू आहे.
आघाडीचा निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहे. तोपर्यंत सर्वच प्रभागात उमेदवारांची चाचपाणी केली जात आहे. असे सांगितले. एकूणच तिन्ही पक्षात समन्वयाचा अभाव असून पीआरपीचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले यांनी समाधानकारक जागा मिळाल्यास महाविकास आघाडीत जाणार असल्याची भूमिका पक्षाची असल्याचे टाले म्हणाले. एकूणच महाआघाडीतील पक्षाची भूमिका एकलो चलो रे ची असल्याचे चित्र शहरात आहे.