उर्दू शाळांच्या नशिबी उपेक्षाच
By admin | Published: September 2, 2015 03:36 AM2015-09-02T03:36:15+5:302015-09-02T03:36:56+5:30
येथील पश्चिमेकडील बल्याणी परिसरातील उर्दू माध्यमाच्या बन्दे अली खान या शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांना एकाच वर्गात दाटीवाटीने बसावे लागते.
प्रशांत माने, कल्याण
येथील पश्चिमेकडील बल्याणी परिसरातील उर्दू माध्यमाच्या बन्दे अली खान या शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांना एकाच वर्गात दाटीवाटीने बसावे लागते. तर मांडा-टिटवाळा येथील मौलान आझाद प्राथमिक शाळेतील पटसंख्येवर जागेच्या कमतरतेमुळे परिणाम झाला आहे. या परिस्थितीवरून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळ प्रशासनाला उर्दू माध्यमाचे वावडे आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मांडा परिसरात ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. तिची पटसंख्या ७३ इतकी आहे. इयत्तांचा आढावा घेता पहिलीत ११, दुसरीत १८, तिसरीमध्ये २६ आणि चौथीत १८ विद्यार्थी आहेत. सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत ती भरते. दोन शिक्षक याठिकाणी कार्यरत आहेत. बालवाडीत ३४ विद्यार्थी शिकत असून त्यांची वेळ सकाळी ९ ते ११ अशी आहे. बहुतांश शालेय साहित्य विद्यार्थ्यांना मिळाले आहे. परंतु, गणवेश आणि बूट वाटपाला अद्यापपर्यंत प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. शालेय पोषण आहार नियमितपणे मिळत आहे. शाळेला सफाई कर्मचारी दिलेला नाही. त्यामुळे येथील स्वच्छतेची जबाबदारी पोषण आहार वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील एका महिलेला पार पाडावी लागते. विशेष बाब म्हणजे मस्जीद ट्रस्टच्या जागेत ती भरते. याठिकाणी एकच खोली उपलब्ध असून चारही इयत्तांचे वर्ग जागेअभावी एकत्रित भरविले जातात. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस आहेत. परंतु, जागा अपुरी असल्याने जमिनीवर सतरंजी अंथरूण विद्यार्थ्यांना बसविले जाते. मांडा-टिटवाळा परिसरात उर्दू माध्यमाची अन्य शाळा नाही. त्यामुळे महापालिकेच्या या शाळेला पुरेशी जागा मिळाली तर पटसंख्या वाढेल असा विश्वास व्यक्त होत आहे. याआधी शाळेची पटसंख्या २५ ते ३० इतकी होती ती आता ७३ च्या आसपास पोहोचली आहे. शिक्षण मंडळ प्रशासनाने जर जागेबरोबरच पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास पटसंख्या वाढीला पोषक वातावरण ठरणार यात शंका नाही.