कल्याणच्या स्वागतयात्रेत एकोप्याचा अभाव, जाहिरातबाजीला जास्त प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 04:10 AM2019-03-23T04:10:38+5:302019-03-23T04:11:06+5:30
गुढीपाडव्यानिमित्त ऐतिहासिक कल्याण शहरात कल्याण संस्कृती मंचाच्या पुढाकाराने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. मात्र, या यात्रेत एकोपा राहिलेला नाही.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली - गुढीपाडव्यानिमित्त ऐतिहासिक कल्याण शहरात कल्याण संस्कृती मंचाच्या पुढाकाराने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. मात्र, या यात्रेत एकोपा राहिलेला नाही. तसेच ही यात्रा सामाजिक उद्देशापासून दुरावली असल्याची नाराजी स्वागतयात्रेचे संस्थापकीय सदस्य भिकू बारस्कर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या यात्रेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बारस्कर यांनी सांगितले की, डोंबिवलीच्या धर्तीवर कल्याणमध्ये २००१ पासून नववर्ष स्वागतयात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी प्रफुल्ल गवळी हे यात्रेचे अध्यक्ष, तर त्यांच्या सोबतीला सुरेश एकलहरे, राजीव जोशी, प्रा. उदय सामंत व बारस्कर होते. या मंडळींना या उपक्रमात माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या मंडळींची साथ मिळाली. या मंडळींच्या कारकिर्दीत दरवर्षी यात्रेत विविध मान्यवर सहभागी होत होते. त्यात एकावेळेस ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, अभिनेत्री निर्मिती सामंत आणि आदेश बांदेकर यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे यात्रेला एक वेगळे वलय प्राप्त झाले होेते.
मात्र, कालांतराने हा उत्साह मावळत गेला. त्यातील सामाजिक उद्देश मागे पडला. तसेच एकोपाही राहिला नाही. एकदा तर कल्याणमधील सफाई कामगार असलेल्या रुखी समाजाला गुढी उभारण्याचा मान दिला गेला होता. सर्व समाजांना यात्रेत सहभागी करून घेताना ही यात्रा सर्वांना आपली वाटावी, असा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो नंतरच्या काळात झालेला दिसला नाही. या यात्रेत विविध संस्थांचे प्रबोधनात्मक चित्ररथ सहभागी होत होते. त्यानंतर, विविध व्यापारी व खाजगी क्लासेसचे चित्ररथ सहभागी झाले. त्यातून त्यांची स्वत:चीच जाहिरात सुरू झाली. यात्रा हे जाहिरातबाजीचे साधन झाले. या सगळ्या गोष्टी व बदलते स्वरूप पाहून त्यातून सामाजिक प्रबोधनाचा उद्देश मागे पडत चालल्याचे पाहून बारस्कर व जोशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यानच्या काळात गवळी यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, ही यात्रा सुरू राहावी, त्यासाठी निधी गोळा केला जातो. या देणगीच्या रकमेतून यात्रेचा खर्च भागवला जावा, असा त्यामागचा उदात्त हेतू होता. मात्र, यात्रेत माणुसकीच हरवल्याने आम्ही दूर झालो, असे सांगत यात्रेच्या आयोजनाविषयी नाराजीचा सूर बारस्कर यांनी व्यक्त केला आहे.
‘मतभेद बाजूला ठेवून संवाद साधायला हवा’
यासंदर्भात कल्याण संस्कृती मंचाचे सरचिटणीस श्रीराम देशपांडे म्हणाले, बारस्कर हे संस्थापकीय सदस्य आहेत. मतभेद बाजूला ठेवून त्यांनी आमच्याशी बोलले पाहिजे. ते आम्हाला हवे आहेत. मंचातील ज्येष्ठ सदस्यांनी हे वाद मिटवणे गरजेचे होते. बारस्कर यांनी यात्रेत एकोपा राहिला नाही, असे वक्तव्य केले असेल, तर एकोपा नसल्याशिवाय इतकी वर्षे यात्रा निघते का, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.
त्याचबरोबर समाजप्रबोधनाऐवजी जाहिरातबाजी केली जात असल्याचा आरोपही चुकीचा आहे. त्याचे कारण आम्ही विविध संस्थांकडून चित्ररथाचे विषय मागवत असतो. त्यामुळे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला आयोजक जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. नव्या संकल्पना राबवण्यास व सांगण्यास कोणाचाही नकार नाही. बारस्कर यांनी पुन्हा यावे, काम करावे, हेच मंचातील सगळ्यांचे मत आहे, असे ते म्हणाले.