लेडिज केडिया, थाली घागरा आणि क्रॉप टॉपची क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:55 PM2019-09-25T23:55:27+5:302019-09-25T23:55:34+5:30
स्पर्धकांची पसंती पारंपरिक घागऱ्यांना; विविध डिझाइन्सचे जॅकेट्स उपलब्ध
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : गरब्यासाठी यंदा इंडो वेस्टर्न पोशाखाला गरबाप्रेमींनी पसंती दिली आहे. पद्मावत चित्रपटातील घागºयाला मागे सारत यावर्षीच्या नवरात्रोत्सवात महिलावर्गाचा कल लेडिज केडिया, थाली घागरा आणि क्रॉप टॉपकडे आहे. मात्र, स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक पारंपरिक चनिया चोली, घागरा खरेदी करताना दिसून येत आहेत. या उत्सवात गडद रंग आणि भरगच्च नक्षीदार काम असलेल्या पेहरावालाच महिलांची अधिक पसंती आहे.
नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने नवरात्रोत्सवात खास घालण्यात येणारा पेहराव आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरीची तुफान खरेदी सुरू आहे. पावसाची धाकधूक मनात असली, तरी खरेदीला मात्र ब्रेक लागलेला नाही. गरब्यात चारचौघांत उठून दिसावे, यासाठी आकर्षक वेशभूषा करण्याकडे खासकरून महिलावर्गाचा कल असतो. त्यामुळे नवीन स्टाइल आली की, त्याप्रमाणे खरेदी केली जाते. यंदा लेडिज केडियाची तुफान क्रेझ आहे. केडिया म्हटले की, ते पुरुषवर्गच परिधान करीत असे. परंतु, या पेहरावावर आता महिलांचेही वर्चस्व आहे. त्यामुळे हा पोशाख बनविणाऱ्यांनी महिलांसाठी केडिया बनवला आहे. क्रॉप टॉपवर धोती किंवा घागरा हा एक आकर्षक पेहराव आहे. क्रॉप टॉपमध्ये साधा क्रॉप टॉप, केडिया क्रॉप टॉप, कच्छी वर्क असलेला क्रॉप टॉप, फ्रील क्रॉप टॉप असे विविध प्रकार आहेत. थाली चनिया चोलीदेखील तरुणींना आकर्षित करीत आहे. डबल, ट्रीपल लेयर्सची चनिया चोली उठून दिसत आहे. कच्छी बॉर्डर असलेला १० मीटरचा घागराही आहे. नवरात्रोत्सवात घेण्यात येणाºया रासगरबा स्पर्धेतील स्पर्धक या घागºयाला पसंती देत आहेत. एक वर्षाच्या चिमुकलीपासून अगदी ३० ते ३५ वर्षांच्या महिलावर्गापर्यंत सर्व महिलांसाठी हे विविध रंगांचे आणि विविध प्रकारांचे पेहराव उपलब्ध आहेत, असे कल्पना गाला यांनी सांगितले.
फिशकटचा जॅकेट गरबा रसिकांना भुरळ घालत आहे. नवीन ट्रेण्ड ज्या पेहरावाचा आहे, तो पेहराव जास्त खरेदी केला जातो. ज्यांना परवडत नाही ते गरबा रसिक भाडेतत्त्वावर पेहराव घेऊन जातात.
- कल्पना गाला