उपवन तलाव कात टाकणार
By admin | Published: February 2, 2016 01:53 AM2016-02-02T01:53:22+5:302016-02-02T01:53:22+5:30
लोकमतने आपल्या काहीतरी तर ठाणेकर या मोहिमेंतर्गत ठाणे शहरातील तलावांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिकेत त्यांचा कायापालट करण्याचा मानस व्यक्त केला होता.
ठाणे : लोकमतने आपल्या काहीतरी तर ठाणेकर या मोहिमेंतर्गत ठाणे शहरातील तलावांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिकेत त्यांचा कायापालट करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार, काही तलावांच्या सुशोभीकरणाचे कामही सुरू झाले आहे. तर, आता ठाण्याची दुसरी चौपाटी म्हणून ओळख असलेला उपवन तलावही येत्या काही दिवसांत कात टाकणार आहे. लोकमतचा पाठपुरावा आणि आ. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मागणीनंतर उपवन तलावाच्या नैसर्गिक सौंदर्याला कोणत्याही प्रकारे बाधा न आणता वाराणसीतील सुप्रसिद्ध बनारस घाटाच्या धर्तीवर विसर्जन घाट व अॅम्पी थिएटर उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. त्यानुसार, वास्तुविशारद अरु णकुमार यांनी संकल्पचित्र महापालिकेच्या शहर विकास विभागाकडे सुपूर्द केल्यानंतर बांधकाम खात्याने १ कोटी ९६ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले.
उपवन तलाव येथे व अॅम्पी थिएटर उभारल्यास फक्त संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच नव्हे तर वर्षाच्या ३६५ दिवस येथे विविध सांस्कृतिक कलाविष्कार होऊ शकतील, तसेच स्थानिक कलाकारांनाही आपली कला सादर करण्याकरिता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर उपवन तलावाशेजारी नागरिकांना बसण्यासाठी फक्त दगडी बांधकामाच्या साहाय्याने १२०० ते १५०० आसनांची व्यवस्था येथे केल्यास नागरिकांनाही विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होऊ शकेल, असे सरनाईक यांनी निदर्शनास आणले होते. त्यानुसार, आयुक्तांनी तसे निर्देश दिल्यानंतर नगर अभियंता रतन अवसरमोल व कार्यकारी अभियंता नितीन पवार यांनी कामास सुरु वात केली आहे. निसर्गरम्य परिसर लाभलेला उपवन तलाव लवकरच कात टाकणार आहे.