लखोबास तीन वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:47 AM2018-12-05T01:47:26+5:302018-12-05T01:47:32+5:30
कोलकाता येथील तन्मय गोस्वामी या लखोबाला ठाणे प्रथम वर्ग (दुसरे) न्यायालयाने ३० नोव्हेंबर रोजी दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
ठाणे: मेट्रोमोनिअल आणि शादी डॉट कॉम यासारख्या लग्न जमवणाऱ्या साईटवर खोटी माहिती अपलोड केल्यानंतर उच्चपदावरील तरूणींना लग्नाचा प्रस्ताव पाठवून त्यांना फसवणा-या कोलकाता येथील तन्मय गोस्वामी या लखोबाला ठाणे प्रथम वर्ग (दुसरे) न्यायालयाने ३० नोव्हेंबर रोजी दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली. मुंबई-ठाण्यातील फसवणूक झालेल्या तरूणींना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे आदेशही त्याला दिले. यात सहायक सरकारी अभिभोक्ता म्हणून रश्मी क्षीरसागर यांनी काम पाहिले.
आरोपी तन्मय याने राहुल सिन्हा याने बनावट नावे जीवन साथी डॉट कॉम या साईटवर प्रोफाईल अपलोड करून तो डेप्युटी कमिशनर असल्याचे भासविले. त्यानुसार ठाण्यातील एका तरूणीला लग्नासाठी प्रस्ताव पाठवून तिला आपली आई कोलकाता येथे, तर बहिणी अमेरिकत असून त्याची बदली मुंबईत झाल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांत ते दोघे भेटलेही. ठाण्यात भेटल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. दरम्यान,त्याने तिला शासकीय योजनेंतर्गत म्हाडामध्ये घर बुकिंगसाठी एक लाखांची गरज असल्याचे सांगून, ते पैसे चेकद्वारे तन्मय गोस्वामी या नावाने देण्यास सांगितले. तिने दिलेला चेक वटल्यानंतर त्याने गाडी घेण्यासाठी वेळोवेळी पैसे मागून तिच्याकडून ६८ हजार रुपये घेतले. याचदरम्यान मुंबईत १८ लाखांची फसवणूक झालेल्या एका तरुणीचा ठाण्यातील या तरुणीला फोन आला. तेव्हा त्याचे बिंग फुटले. तिने मुंबई, बांगूरनगर येथे गुन्हा दाखल केल्याची माहिती दिल्यावर ठाण्यातील तरुणीनेही तिची फसवणूक झाल्याची तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याला ७ जून २०१५ रोजी मद्रास पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर, तो विवाहीत असून त्याला दहा वर्षांचा मुलगा असल्याची बाब तपासात पुढे आली. या प्रकरणी ठाणे जिल्हा प्रथम वर्ग (दुसरे) न्यायालयाच्या न्यायाधीश आर. एच. झा यांच्यासमोर झाली. सहायक सरकारी वकील क्षीरसागर यांनी सादर केलेले पुरावे आणि फिर्यादीसह चार साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून त्याला दोषी ठरवले. त्यानुसार, त्याला फसवणूकप्रकरणी तीन वर्ष, पैसे घेण्याच्या गुन्ह्याखाली दोन आणि आयटी अॅक्टनुसार एक वर्ष अशी शिक्षा सुनावली. त्याचबरोबर त्याला तक्रारदार आणि मुंबईतील साक्षीदार या दोघींना प्रत्येकी दोन लाख देण्याचे आदेश दिले आहेत.
>ही नावे केली
होती त्याने धारण
तन्मयने राहुल सिन्हा, हेंमत गुप्ता, संजीव चॅटर्जी, राजेश गुप्ता या नावाने बनावट प्रोफाईल तयार केले होते. जीवन साथी डॉट कॉम, भारत मेट्रोमोनिअल, शादी डॉट कॉम या साईटवर प्रोफाईल अपलोड करून, बंगळुरुमधील तीन, पुण्यातील एक आणि ठाणे-मुंबईतील दोघांची अशा सहा जणांची त्याने फसवणूक केल्याची नोंद आहे.
>आरोपी बंगळुरु कारागृहात
तन्मय हा सध्या बंगळुरुतील कारागृहात असून या खटल्याप्रकरणी ठाण्यात आणून त्यांचा जबाब नोंदवला. हैद्राबाद (गुन्हे) पोलीस निरीक्षक प्रसाद यांचीही साक्ष झाली.
तक्रारदार जर्मनीतून आल्या
या गुन्ह्यातील तक्रारदार नोकरीनिमित्त जर्मनीत वास्तव्यास आहे.त्यांनी याप्रकरणी जर्मनीतून येऊन तन्मयविरोधात साक्ष दिली. त्यानंतर आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली.