वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली लाखोंचा गंडा; अखेर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:56 PM2022-04-20T12:56:25+5:302022-04-20T12:57:07+5:30

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी याप्रकरणी आदेश देताच श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणातील पहिला गुन्हा दाखल केला आहे.

Laks of fraud in the name of medical admission; Finally filed a crime | वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली लाखोंचा गंडा; अखेर गुन्हा दाखल

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली लाखोंचा गंडा; अखेर गुन्हा दाखल

Next

जितेंद्र कालेकर -

ठाणे
: सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून नामांकित वैद्यकीयमहाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली राज्यभरातील पालक तसेच विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात अखेर सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी याप्रकरणी आदेश देताच श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणातील पहिला गुन्हा दाखल केला आहे.

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाने राज्यातील विद्यार्थ्यांना गंडा, ठाण्यातील खासगी संस्थेने गाशा गुंडाळला, तक्रारीऐवजी पालकांचीच घेतली शाळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’च्या १८ एप्रिल २०२२ च्या अंकामध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. मुंबईतील परळ येथील रहिवासी धर्मेंद्र जैन  यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ जानेवारी २०२२ ते १८ एप्रिल २०२२ यादरम्यान वागळे इस्टेट येथील मेरिट ब्ल्यू इंडिया प्रा. लि. या खासगी कंपनीतील करणसिंग भदोरिया, शोभा राठोड आणि रजनीश पटेल यांनी आपसात संगनमत करून या कंपनीद्वारे एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असा दावा केला. त्यासाठी त्यांच्याकडून धनादेशाद्वारे तीन लाखांची रक्कमही घेतली. मात्र, ठरल्याप्रमाणे प्रवेश मिळवून न देता या रकमेचा त्यांनी अपहार केला. 

असा घातला गंडा -
- जैन यांच्या मुलाचा नीट परीक्षेमध्ये राज्यात २१ हजारावा क्रमांक आला. एमबीबीएससाठी गुणवत्ता यादीत त्याचे नाव आलेच नाही. 
- मात्र २९ जानेवारी २०२२ रोजी जैन यांना ठाण्यातील मेरिट ब्ल्यू इंडियाच्या कंपनीतून सोनम नामक महिलेने फोन करून तुमच्या मुलाला एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. त्यांना काही महाविद्यालयांची नावे देण्यात आली. 
- प्रवेशासाठी तीन लाखांची रक्कम मेरिट ब्ल्यूच्या नावाने तर सहा लाख ६० हजारांचा डीडी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या नावाने देण्यास ८ एप्रिल २०२२ रोजी सांगण्यात आले. 
- धनादेश वटल्यानंतर मात्र डीडी बनवू नका असा मेसेज त्यांना या कंपनीतून आला. १७ आणि १८ एप्रिल रोजी ठाण्यातील संबंधित कार्यालय बंद आढळल्यानंतर हा प्रकार समोर आला.
- यात पुणे, अकोला, जळगाव अशा राज्यभरातील अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली असून हा आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता पालकांनी वर्तविली आहे.
 

Web Title: Laks of fraud in the name of medical admission; Finally filed a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.