लालपरी अडकली वाहतूक कोंडीत; तिसऱ्या दिवशीही नोकरदारांचे हाल सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 09:44 AM2020-06-10T09:44:11+5:302020-06-10T09:44:30+5:30
12 बस पैकी तीन पोहोचल्या
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : कल्याण शीळ महामार्गावरील रस्ता रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने तेथे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. ती कोंडी काही केल्या कमी होत नसल्याने राज्य परिवहन मंडळाचा मनस्ताप वाढला असून त्या कोंडीत लालपरी अडकल्याने डोंबिवलीकर चाकरमान्यांचे सलग तिसऱ्या दिवशी हाल सुरूच होते. इंदिरा गांधी चौकात बस वेळेवर न आल्याने पहाटे 5.30 पासून रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या नागरिकांनी राज्य शासनाच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली. तीन दिवस झाले तरीही नियोजन करता येत नसल्याने कामावर जायचे तरी कसे, असा सवाल चाकरमान्यांनी विचारला.
डोंबिवलीकरांना नेण्यासाठी राज्य परिवहनच्या सकाळच्या पहिल्या सत्रातील 7 वाजेपर्यँतच्या 12 पैकी 9 बस शीळफाटा येथे वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामुळे त्या सकाळी 8 वाजे पर्यत येऊ न शकल्याने कर्मचारी तातकळले होते. रांगेत तरी किती वेळ उभे राहायचे अस सवाल करत महिला प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. बस कोंडीत असलंडकल्या त्याला आम्ही काय करणार असे उत्तर राज्य परिवहनच्या नियंत्रक अधकार्यांनी दिले. त्यानुसार नागरिकांनीही बस रात्री आल्यावर इथेच का थांबवून ठेवत नाही असा सवाल करत त्याचे नियोजन करावे अशी सूचना केली. त्यावर मात्र अधिकारी निरुत्तर झाले होते.
रेल्वे सुविधा सुरू करा
अत्यवशयक सेवा देण्यासाठी रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, रेल्वे मन करिता लोकल सुरू आहे तर आमच्यासाठी का नाही? राज्य शासन कुठे तरी कमी पडत असून सकाळच्या 6 ते 9.30 वाजेपर्यंत कल्याण, बदलापूर व डोंबिवलीमधून विशेष लोकल सोडल्या तर रस्त्यावरची गर्दी नियंत्रणात येईल, वाहतूक कोंडीत अडकावे लागणार नाही, पण यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्रस्त महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.