Thane News: दिव्यातील पाणी समस्या; पाण्यासाठी भाजपचा महापालिकेवर हंडा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:34 PM2022-04-20T15:34:59+5:302022-04-20T15:35:34+5:30
Thane News: दिव्याला मंजुर असलेल्या पाण्यापेक्षाही कमी पाणी पुरवठा होत आहे. मागील कित्येक वर्षापासून सुरु असलेले रिमॉडेलींगचे कामही अपूर्ण आहे.
ठाणे - दिव्याला मंजुर असलेल्या पाण्यापेक्षाही कमी पाणी पुरवठा होत आहे. मागील कित्येक वर्षापासून सुरु असलेले रिमॉडेलींगचे कामही अपूर्ण आहे. तसेच सत्ताधा-यांच्या मर्जीनुसार येथे पाण्याचे वॉल खुले केले जातात, अशा वॉलमनची बदली करण्यात यावी आदींसह पाण्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी या मागणीसाठी बुधवारी दिव्यातील रहिवाशांसह भाजपने ठाणो महापालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी एका महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे. मात्र तरीसुध्दा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र पालिका अधिका-यांना खुर्चीत बसू दिले जाणार नसल्याचा गंभीर इशारा माजी मंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण, संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी यावेळी दिली.
नितीन कंपनी ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालिका मुख्यालयासमोर आल्यानंतर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच यावेळी हातात आणलेले मडकी फोडून दिवा वासियांनी प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर भाजपच्या शिष्ठ मंडळाने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी पाण्याची समस्या केव्हा सुटणार, रिमॉडेलींगचे काम का थांबले, ते केव्हा पूर्ण होणार, कोणत्या कारणासाठी हे काम थांबले आहे, किती टक्के काम पूर्ण झाले असा अनेक सवाल यावेळी आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केले. त्यावर एमआयडीसीकडून दिव्याला वाढीव पाणी मिळणार आहे, सध्या या भागासाठी 35 दशलक्ष लीटर पाणी मंजुर असून 29 दशलक्ष पाणी पुरवठा होत आहे. जलवाहीनी टाकण्याचे काम सध्या अपूर्ण आहे, त्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल असा दावा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी विकास ढोले यांनी केला. परंतु हे काम केव्हा पूर्ण होणार, एमआयडीसीकडून वाढीव पाणी मिळेल असे सांगितले जात असले तरी जे मंजुर आहे, तेवढे पाणी तर द्या अशी मागणीही यावेळी या शिष्ठमंडळाने केली. तर ठेकेदाराचे ६५ कोटींचे बील देणो शिल्लक असल्याने हे काम मार्गी लागू शकले नसल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले. परंतु हे बील कधी अदा केले जाणार असा सवालही यावेळी चव्हाण यांनी केला. त्यानुसार लवकरच हे बील अदा केले जाणार असून शिल्लक कामही येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. त्यानुसार शिष्ठमंडळाने हे आश्वासन मान्य करीत आंदोलन मागे घेतले.
नवीन कनेक्शनसाठी १ लाख, टॅंकर माफीयांचा सुळसुळाट
दिव्यात नवीन कनेक्शन हवे असल्याने त्यासाठी माजी नगरसेवकांची माणसे एक लाख रुपये घेत असल्याचा गंभीर आरोप यावेळी दिवा मंडल अध्यक्ष रोहीदास मुंढे यांनी केला. तसेच टॅंकर माफीया देखील पाणी चोरुन विकत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अन्यथा अधिका-यांना खुर्चीवर बसू देणार नाही दिव्याची पाणी समस्या एका महिन्यात मार्गी लागली नाही तर महापालिका अधिका:यांना खुर्चीवर बसू दिले जाणार नाही. असा गंभीर इशाराही यावेळी देण्यात आला.