ऑनलाइन सेवांसाठी दिव्याचा पिनकोड अडचणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:02+5:302021-03-05T04:40:02+5:30
ठाणे: दिवा शहरासाठी ४००६१२ हा पिन कोड असून, त्यावर ऑनलाइन सेवा-सुविधांची मागणी केली असता, त्या उपलब्ध नसल्याचे ऑनलाइन शॉपिंग ...
ठाणे: दिवा शहरासाठी ४००६१२ हा पिन कोड असून, त्यावर ऑनलाइन सेवा-सुविधांची मागणी केली असता, त्या उपलब्ध नसल्याचे ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर दाखवण्यात येते. त्यामुळे नागरिकांना कायमच मनस्ताप सहन करावा लागतो. परिणामी, ठाण्याचे उपनगर असणाऱ्या दिवा शहरासाठी स्वतंत्र पिनकोड देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी मुख्यमंत्री व पोस्ट विभागाकडे केली आहे.
दिवा शहराची लोकसंख्या मागील काही वर्षांत चार ते पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. या शहरांमध्ये अनेक गृहसंकुले नव्याने उभी राहत असून, नवनवीन प्रकल्प येथे उभे राहत आहेत. अलीकडे नागरिकांना ऑनलाइन खरेदी करावयाची असल्यास येथील नागरिक तशी मागणी ऑनलाइन पोर्टलवर करतात. त्या ठिकाणी दिवा भागात या सुविधा उपलब्ध नसल्याची सूचना त्या ठिकाणी दिसते. यामागची नेमकी कारणे काय, याचा तपास केला असता, पिनकोडची अडचण समोर आली. यामुळे दिवा शहराचा पिन कोड बदलण्यात यावा, अशी मागणी टील यांनी केली आहे. याशिवाय दिवा शहरात पोस्टाने नागरिकांची येणारी पत्र व अन्य कागदपत्रेही वेळेत उपलब्ध होत नसल्याने दिव्यासाठी स्वतंत्र पोस्ट ऑफिसची व्यवस्था करावी, असे पत्र त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही दिली आहेत.
-------------------