भूखंडाच्या वादातुन प्रकाश तलरेजा यांना मारहाण; ओमी कलानी टीमच्या ५ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:25 AM2021-01-14T11:25:04+5:302021-01-14T11:25:14+5:30
प्रकाश तलरेजा यांना पोलीस ठाण्यासमोर झालेल्या मारहाणीचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : एका भूखंडाच्या वादातुन प्रकाश तलरेजा यांना उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोरच मारहाण झाल्याने, पोलीस कारभारावर प्रश्नचिहे उभे ठाकले. मारहाण प्रकरणी ओमी टीमचे कमलेश निकम, संतोष पांडे, मनीष हिंगोरांनी, एक महिला व एक व्यक्ती अश्या एकूण ५जणांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगरातील झुलेलाल शाळे शेजारील भूखंडाचा वाद चव्हाट्यावर आला. शाळा ट्रस्ट व माजी नगरसेवक मोहन रामरख्यानी यांचा मुलगा अजय रामरख्यानी यांच्यात वाद असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असतांना गेल्या काही दिवसांपासून भूखंडावर काही जण बांधकाम करीत असून भूखंड हडप करण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप शाळा ट्रस्ट व त्यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी प्रकाश तलरेजा यांनी केला. याबाबत शाळा शिक्षकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी भेट घेऊन चर्चा केली. बुधावारी चर्चा संपून पोलीस ठाण्याबाहेर येताच प्रकाश तलरेजा यांच्यावर एका महिलेसह अन्य जणांनी हल्ला व मारहाण झाली. ओमी कलानी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम, टीमचे अध्यक्ष संतोष पांडे, मनीष हिंगोरांनी यांच्या सांगण्यावरून हल्ला व मारहाण झाल्याचे तलरेजा यांनी तक्रारीत म्हटले.
प्रकाश तलरेजा यांना पोलीस ठाण्या समोर झालेल्या मारहाणीचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. याप्रकाराने एका आठवड्या पूर्वी १५ ते २० जणांच्या टोळक्यांनी तलवारी नाचवत रमाबाई आंबेडकरनगर येथील काही घरे, गाड्या व वीज मीटरची तोडफोड करून दहशद माजविनाऱ्या प्रकाराची आठवण झाली. अश्या प्रकाराने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हे निर्माण झाल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. पोलिसांनी याप्रकारची वेळीच दखल घेतली असतीतर, पुढील अनर्थ टळला असता. असेही बोलले जात आहे.
याबाबत ओमी कलानी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांच्याशी संपर्क साधला असता, तलरेजा मारहाण प्रकरणी कलानी टीमचा काही एक संबंध नाही. आम्हाला जाणीवपूर्वक गुंतविल्याचे त्यांचे म्हणणे आहे. झुलेलाल शाळे जवळील भूखंडा बाबत आमदार कुमार आयलानी याच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या सोबत चर्चा केली. एकूणच देशात सर्वाधिक घनता असलेल्या उल्हासनगरात जागेला सोन्याचे भाव आल्याने, खुल्या जागा, महापालिका भूखंड,उद्याने, पालिका शाळा जागा, शासकीय जागा आदींवर सर्रासपणे अतिक्रमण होत असल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेच्या दुर्लक्षाने अनर्थ?
महापालिका हद्दीत कोणतेही बांधकाम करीत असताना आदी परवानगी घ्यावी लागते. विना परवानगी सुरू असलेल्या बांधकामावर संबंधित पालिका अधिकारी पाडकाम कारवाई करू शकतो. मात्र तसे होत नसल्याने, शहरात अवैध बांधकामाला ऊत आला असून आयुक्त याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. महापालिका प्रशासन, महापौर, उपमहापौर यांनीही बघ्याची भूमिका घेत असल्याने भूमाफियाचे फावले झाल्याचेही टीका सर्वस्तरातून होत आहे