माळशेज घाटात भूस्खलन सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:24 AM2018-08-24T01:24:12+5:302018-08-24T01:24:53+5:30
दगडमाती हटवण्यात पावसाचा अडथळा; दोन दिवसांत रस्ता सुरू होण्याचा अंदाज
ठाणे / टोकावडे : माळशेज घाटातील रस्ता गुरुवारी संध्याकाळपर्यंत मोकळा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, पावसाचा जोर आणि धुके यामुळे कामात व्यत्यय येत आहे. याशिवाय, डोंगरमाथ्यावरून भूस्खलन सुरूच आहे. यामुळे मोठमोठे दगड निखळण्याची भीती आहे. तरीदेखील रस्त्यावरील ७० टक्के दगडमाती गुरुवारी हटवण्यात आली. मात्र, नैसर्गिक आपत्तीत खबरदारीची उपाययोजना म्हणून काही दिवस घाट बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
दाट धुके आणि पाऊस यामुळे रस्त्यावरील मातीचा खच उचलण्यास अडथळा येत आहे. या ठिकाणी दोन मशिन्स दगडमाती हटवण्याचे काम करत आहेत. डोंगरकड्यावरून दगडमाती निखळत तर नाही ना, याचा अंदाज घेऊनच काम करावे लागत आहे. तरीदेखील एक गाडी जाईल, एवढा रस्ता गुरुवारी मोकळा झाला. रस्त्यावर १०० मीटरपेक्षा अधिक असलेला मातीचा खच सुमारे ७० टक्के हटवला. शुक्रवारी तो मोकळा होण्याची शक्यता आहे. परंतु, बुधवारी कोसळलेल्या दरडीचा काही भाग डोंगराच्या सुळक्यावर अडकला आहे. तो खाली पडल्यानंतर पुन्हा रस्त्यावर दगडमाती होईल. गुरुवारी सायंकाळपर्यंत भरपावसात जीव धोक्यात घालून काम करावे लागल्याचे कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी सांगितले.
रस्त्यावरील दगडमाती हटवण्याचे काम माळशेज घाटातील छत्री पॉइंट याठिकाणी सुरू आहे. घाटातील याठिकाणची केएम ९१/०० एनएच ६१ अशी नोंद केलेली आहे. या ठिकाणचे काम शुक्रवारीदेखील पावसाचा अंदाज घेऊन करावे लागेल. आतापर्यंत छोटी गाडी पास होईल, असा रस्ता मोकळा झाला. शुक्रवारी पावसाने मोकळीक दिल्यास काम वेगाने हाती घेता येईल. शक्यतोवर शुक्रवारी रस्ता पूर्ण मोकळा होण्याची शक्यता महाजन यांनी वर्तविली.
निरीक्षणाखाली ठेवणार
रस्ता मोकळा झाल्यानंतरही वाहकाच्या जीवितास धोका होऊन नये, यासाठी एक दिवसाकरिता रस्ता निरीक्षणाखाली ठेवावा लागेल. त्यानंतर, परिस्थिती पाहून घाटातील वाहतूक सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय घ्यावा लागेल.
सुळक्यावरून खाली दगड येताच आम्हाला पळतच छत्री पॉइंटवर येऊन थांबावे लागत आहे. नैसर्गिक आपत्ती आहे, त्यासंदर्भातील निर्णय घाईगर्दीत घेणे योग्य होणार नाही, असे मुरबाडचे पोलीस निरीक्षक डी.सी. पोरे यांनी लोकमतला सांगितले.
मंगळवारी पहाटे या घाटात दरड कोसळून एक टेम्पोचालक जखमी झाला. या टेम्पोचे मोठे नुकसान झाले. आजच्या तिसऱ्या दिवशीदेखील रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. पावसाचा जोर पाहून ते अधूनमधून बंद करावे लागत आहे.
डोंगराच्या सुळक्यावर अडकलेले दगड कोसळून जीवितहानी होऊ नये, म्हणून अंदाजे दोन दिवस तरी वाहतूक बंद ठेवावी लागणार असल्याचे आमच्या स्थानिक टोकावडे वार्ताहराने कळवले आहे.