मुंब्रा बायपासवर दरड कोसळल्यानं वाहतुकीची कोंडी, प्रवासी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 11:48 AM2017-09-09T11:48:47+5:302017-09-09T11:58:14+5:30
मुंब्रा बायपास रोडवर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळीच दरड कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मुंबई, दि. 9 - मुंब्रा बायपास रोडवर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळीच दरड कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेनं दरड हटवण्याचे काम हाती घेतले आहे. ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापनाची टीम तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाली आहे. सकाळी दरड कोसळल्याने कामवर निघालेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट
दुसरीकडे, खारेगाव टोल नाक्याजवळील ठाणे-नाशिक रोड वर टँकर उलटल्याने नाशिक रोडवर देखील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसत आहे. नाशिक, कल्याण व मुंबईच्या दिशेनं येणा-या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. या खोळंब्याचा गैरफायदा घेत भिवंडीतील रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. कल्याणला जाण्यासाठी 40 तर ठाण्यात पोहोचण्यासाठी 50 रूपये भाडे आकारले जात आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांनी या मार्गावरुन वाहनांना जाण्यास मनाई केली असून पर्यायी रस्त्यांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले आहे.