मराठी भाषेचा कणाच डळमळीत झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:16 AM2018-04-30T03:16:02+5:302018-04-30T03:16:02+5:30
राज्यात मराठी भाषेसाठी आंदोलने होताना दिसतात; पण मराठी शाळा टिकावी म्हणून कोणताही नेता पुढे येत नाही.
ठाणे : राज्यात मराठी भाषेसाठी आंदोलने होताना दिसतात; पण मराठी शाळा टिकावी म्हणून कोणताही नेता पुढे येत नाही. आंदोलने करणाऱ्या नेत्यांची मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जातात. मराठी शाळा हीच मराठी भाषेचा कणा आहे; मात्र, आज हा कणाच डळमळीत झाला असल्याची खंत प्रा.डॉ. वीणा सानेकर यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिक्षण मंडळाच्या मो.कृ. नाखवा हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय स्त्री जीवन परिषद हॉल येथे ‘शालेय शिक्षण मायबोलीतूनच’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादात डॉ. सानेकर बोलत होत्या. जे प्राध्यापक, शिक्षक, कलावंत, साहित्यिक मराठी भाषा टिकावी, यासाठी प्रयत्न करतात; पण त्यांची मुले मात्र इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना दिसून येत आहे. जोवर महाराष्ट्रातील मराठी माणूस मराठी शाळांच्या मागे खंबीरपणे उभा राहत नाही, तोवर मराठी शाळेचे चित्र बदलणार नाही. मराठी भाषा दिन आला की, मराठी भाषेचा अनेकांना पुळका येतो. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गाणे गायले जाते; पण त्या गाण्यातील ओळींप्रमाणे खरेच मराठी नांदते आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुलांना मराठी माध्यमात शिकवले तर काही नुकसान होत नाही. आता मराठी शाळांच्या अस्तित्वाचा लढा तीव्र करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मराठी शाळांसमोरील आव्हाने व उपाय या विषयावर आपले मत मांडताना माजी मुख्याध्यापक अशोक टिळक म्हणाले की, मराठी शाळांसमोर सर्वात मोठे आवाहन हे आज विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्याचे आहे. घराघरांतून मातृभाषेतून शिक्षण असा आग्रह धरला पाहिजे, असे टिळक म्हणाले. परिसंवादात अमृता संभूस, राजेंद्र प्रधान यांनी विचार मांडले.