मोठ्या फटाक्यांनी शहराच्या कानांना बसले दडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:10 AM2020-11-16T00:10:06+5:302020-11-16T00:10:14+5:30

राज्य सरकारच्या आवाहनाकडे नागरिकांचे दुर्लक्ष ; काेराेनाचा धाेका असूनही केली प्रदूषणकारी आतषबाजी

Large firecrackers hit the ears of the city | मोठ्या फटाक्यांनी शहराच्या कानांना बसले दडे

मोठ्या फटाक्यांनी शहराच्या कानांना बसले दडे

Next

धीरज परब
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : राज्य सरकारने केवळ लहान फटाके लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडण्यास, तर मीरा-भाईंदर महापालिकेने केवळ दिवाळीमध्येच रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके फोडण्याची परवानगी दिली असताना मीरा-भाईंदरमध्ये मात्र सरकार आणि पालिकेचे आदेश धुडकावून मोठे फटाके दिवसरात्र फोडण्यात येत आहेत. महापालिका, पोलीस आणि नगरसेवकही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण पर्यावरणासच नव्हे तर मानवी आरोग्याला गंभीर अपायकारक ठरत आहे. फटाक्यांचा आवाज आणि विषारी धुरामुळे आजारी रुग्णच नव्हे तर लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, श्वसन आदी विविध आजार असलेल्या लोकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरे केले जात असताना दिवाळीत फटाके फोडू नये, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी केले होते. फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या धुराचा गंभीर परिणाम कोरोना रुग्णांवर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. सार्वजनिकस्थळी फटाके फोडू नये, असे त्यांनी स्पष्ट करतानाच दिवाळीत केवळ रात्री ८ ते १० पर्यंतच फटाके वाजवण्यास परवानगी दिली होती.
परंतु, शहरात मात्र सर्रास पालिका आणि सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन केले जात आहे. शांतता क्षेत्रेही फटाक्यांच्या आवाजाने गजबजून गेली आहेत. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंतही फटाके फोडले जात आहेत.
पालिकेने परवानगी दिल्याव्यतिरिक्त अन्य वेळांत फटाके फोडल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता, तोही फुसका  ठरला. पोलीसही गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. पोलिसांची वाहने काही भागात केवळ गस्त घालत असताना दिसत असली, तरी फटाके फोडणाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई मात्र केली जात नव्हती. पोलीस ठाण्यातील दूरध्वनीही लागत नव्हता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने दिवाळी साजरी करावी, मोठे फटाके न फोडता केवळ लक्ष्मीपूजनाला लहान आवाजांचे फटाके फोडावेत, असे आवाहन सरकारने करूनही नागरिकांनी त्याकडे कानाडोळा करत मोठे फटाके फोडले. फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना किंवा अन्य रुग्णांना त्रास होऊ शकतो, असे सांगितले होते. पण, आनंद साजरा करताना सामान्यांनी नियम धाब्यावर बसविले. वास्तविक यंत्रणांनी हे रोखण्यासाठी कठोर पावले उचलायला हवी होती, पण तसे झाले नाही. लक्ष्मीपूजनाला नेमकी विविध शहरांत काय वस्तुस्थिती होती, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा...

फटाक्यांचा आवाज आणि धूर हा लोकांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असूनही प्रशासन आणि लोकसेवक जर याबाबत गंभीर नसतील, तर त्यांनाही जबाबदार धरले पाहिजे. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. रुग्ण, वृद्ध, लहान बाळ, आजारी लोकांवर या विषारी धूर व आवाजाचे गंभीर परिणाम होतात, याचे भान सर्वांनी राखले पाहिजे. मुळात पालिकेने फटाकेविक्रीलाच परवानगी दिली नाही पाहिजे.
- सरिता नाईक, पदाधिकारी, 
सारथी फाउंडेशन


पहाटेपासून मध्यरात्रीनंतरही मोठ्या आवाजांचे फटाके फोडले जात होते. पोलिसांना व पालिकेला कळवूनही कारवाई केली जात नाही. फटाक्यांचा आवाज आणि धुरामुळे आजारीच नव्हे तर आमच्यासारख्या धडधाकट लोकांनाही जो त्रास होतो, तो सहन होण्यापलीकडचा झालेला आहे. पालिका, पोलीस आणि राजकारणी यांनी ठोस कारवाई केली तरच याला आळा बसेल.
- सुरेश गोलानी, नागरिक

Web Title: Large firecrackers hit the ears of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.