अंबरनाथमधील खुंटवली डोंगरावर वणवा पेटल्याने असंख्य वृक्ष होरपळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 05:43 PM2018-11-23T17:43:18+5:302018-11-23T21:07:03+5:30
मंगरूळ येथे डोंगरावर लावलेल्या झाडांना आग लावल्याचे प्रकरण ताजे असतानाच अंबरनाथ खुंटवली येथे डोंगरावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून लावलेल्या झाडांना आग लागली आहे.
अंबरनाथ -येथील मंगरूळ येथे डोंगरावर लावलेल्या झाडांना आग लावल्याचे प्रकरण ताजे असतानाच अंबरनाथ खुंटवली येथे डोंगरावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून लावलेल्या झाडांना आग लागली आहे. पंधरा दिवसाच्या अंतरावर सलग दोन वेळा अंबरनाथ तालुक्यातील वनक्षेत्राला आग लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जुलै महिन्यातच खुंटवली येथील वन विभागाच्या जागेवर खासदार शिंदे आणि सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 58 हजारांपेक्षा अधिक वृकक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यातील बहुसंख्य वृक्ष हिरवेगार झालेले असतानाच शुक्रवारी दुपारी या डोंगराला आग लागली. या आगीत असंख्या वृक्ष होरपळून निघाली आहेत. सतत घडणाऱ्या या प्रकारामुळे वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेला खीळ बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खुंटवली येथील डोंगरावर वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमादरम्यान परिसरामध्ये हजारो नागरिकांनी एकत्रित येऊन तब्बल 58 हजार वृक्षांची लागवड केली होती . या लागवडीनंतर त्याचे संगोपन वन विभागाच्या मार्फत करण्यात येत होते. मात्र या डोंगरावरील सुकलेल्या गवताला आग लागल्याने या डोंगरावर मोठा वणवा दुपारी एकच्या सुमारास लागला. याची माहिती स्थानिकांना मिळतात कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हवेचा वेग वाढल्याने वनवा जास्तच भडकला. याची माहिती वनविभागाला आणि अग्निशमन विभागाला मिळतात संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने पेटलेला वणवा तासाभरात विझवण्यात आला. मात्र तोपर्यंत 58 हजार वृक्ष या वणव्याच्या भक्षस्थानी पडले. दरम्यान या सतत घडणाऱ्या प्रकारामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मंगलूर येथील वृक्षांना वणवा लागला होता तर आता खुंटवली येथील वनसंपदा या वणव्यात सापडले. मांगळूर येथील घटनेनंतर वनविभागाने वृक्ष संवर्धनासाठी कोणतीच ठोस उपाययोजना केलेली नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. खासदार शिंदे यांनी राबवलेल्या मोहिमेतील वृक्षांना आग लागत असल्याने यामागे राजकारण तर नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. मांगलूर येथील डोंगरावरील वनवा आणि खुंटवली येथील वनवा हे दोन्ही प्रकार वनविभागाच्या चांगलाच अंगलट आलेले आहे. वन विभागाच्या एका अधिकाऱ्याला निलंबनाची कारवाई करण्यात आली होती . त्यातून देखील वनविभागाने कोणता धडा घेतलेला नाही असेच दिसत आहे.