दोन दिवसात रस्त्यांवर मोठे खड्डे; मीरा रोडला खड्ड्याने घेतला पहिला बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:16 AM2022-07-06T06:16:55+5:302022-07-06T06:17:43+5:30

दुचाकीस्वाराचा खड्ड्याने बळी गेल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्यास सुरुवात केली.

Large potholes on roads in two days thane; The first dead at Mira Road | दोन दिवसात रस्त्यांवर मोठे खड्डे; मीरा रोडला खड्ड्याने घेतला पहिला बळी

दोन दिवसात रस्त्यांवर मोठे खड्डे; मीरा रोडला खड्ड्याने घेतला पहिला बळी

Next

मीरा रोड : वाहतुकीची मोठी वर्दळ असलेल्या घोडबंदर मार्गावर अवघ्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, शासनाच्या दुर्लक्षामुळे मंगळवारी काजूपाडाजवळ खड्ड्यामुळे दुचाकी खाली पडल्याने मागून आलेल्या एसटी बसखाली सापडून मोहनीश अहमद इरफान खान (वय ३७, रा . पठाणवाडी, मुंब्रा) या दुचाकीस्वारचा मृत्यू झाला. याच मार्गावर अन्य एक 
दुचाकीस्वार खड्ड्यात पडला; पण सुदैवाने बचावला.

इलेक्ट्रिशियन असलेले मोहनीश अहमद इरफान खान हे मंगळवारी ठाण्याकडून घोडबंदर मार्गाने दुचाकीवरून काशीमीरा भागातील जेपी इन्फ्रा भागात कामासाठी चालले होते. सकाळी ११ च्या सुमारास काजूपाडा येथे रस्त्यावर पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात दुचाकी फसल्याने खान हे दुचाकीसह खाली पडले. त्याचवेळी मागून ठाणे-बोरिवली ही एसटी बस वेगाने आली व रस्त्यावर पडलेले खान हे बसच्या मागील चाकाखाली सापडून मरण पावले. काशीमीरा पोलीस ठाण्यात एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले.

खड्डे भरण्यास सुरुवात 
याच भागात आणखी एक दुचाकीस्वार खड्ड्यामुळे खाली पडला होता. परंतु त्यावेळी सुदैवाने मागून भरधाव वेगात एखादे अवजड वाहन येत नसल्याने तो बचावला. दुचाकीस्वाराचा खड्ड्याने बळी गेल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्यास सुरुवात केली.

२४ तास अधिकारी नेमण्याची मागणी 
वाहतूक शाखेचे निरीक्षक रमेश भामे म्हणाले की, पाऊस पडत असला, तरी वाहनांची मोठी वर्दळ पाहता खड्डे बुजवणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने खड्डे बुजवण्यासाठी खड्डे बुजवणारे पथक व अधिकारी २४ तास नेमण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

Web Title: Large potholes on roads in two days thane; The first dead at Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.